कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : कोपरगाव मतदार संघातील जुन्या झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महायुती शासनाने धारणगाव, धोत्रे, मुर्शतपूर, जेऊर पाटोदा, दहेगाव बोलका, करंजी बु., शिंगणापूर व चासनळी ह्या आठ गावांच्या नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे एकूण ०२ कोटी रुपये निधी मंजुर केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत ही गावच्या लोकशाही व्यवस्थेचा मुख्य पाया आहे. गावोगावी होणारी विकासकामे, नागरिकांना मिळणाऱ्या लाभाच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी, नागरिकांना मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधा याचे केंद्र म्हणजेच ग्रामपंचायत. या ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत सर्व सोयी- सुविधांनी परिपूर्ण असेल तरच ग्रामस्थांना चांगल्या प्रकारच्या सेवा मिळू शकतात व गाव कारभारी व प्रशासकीय अधिकारी यांना देखील काम करताना कोणत्याही अडचणी येत नाही.

परंतु कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांमध्ये सुसज्ज इमारत नसल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत होण्यात अडचणी येत होत्या. ही अडचण ओळखून आ.आशुतोष काळे यांनी नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल करून सातत्याने पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्यातून आठ ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी महायुती शासनाकडून दोन कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्यामुळे लवकरच या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती पूर्ण होऊन या नवीन इमारतींमुळे केवळ कामकाजाची गती वाढणार नाही तर गावकऱ्यांना आवश्यक सेवा एकाच छताखाली सुलभ पद्धतीने मिळणार आहेत. नागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांना डिजिटल व्यवहार, ऑनलाइन प्रमाणपत्रे, बँकिंग व इतर सेवा गावातच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महायुती शासनाच्या या निर्णयाबद्दल आ.आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.“गावच्या प्रगतीसाठी मजबूत व सक्षम ग्रामपंचायत इमारत ही काळाची गरज आहे. शासनाने मंजूर केलेल्या या निधीमुळे गावोगावी आधुनिक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती उभ्या राहतील. त्यामुळे ग्रामपंचायत कारभार अधिक पारदर्शक, प्रभावी व लोकाभिमुख होईल. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता तो पाठपुरावा यशस्वी झाल्याचा आनंद आहे. कोपरगाव मतदारसंघातील विकासकामे अधिक वेगाने पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसाठी दोन कोटी निधी दिल्याबद्दल केंद्र शासन तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आ.आशुतोष काळे यांनी धारणगाव, धोत्रे, मुर्शतपूर, जेऊर पाटोदा, दहेगाव बोलका, करंजी बु., शिंगणापूर व चासनळी ह्या आठ गावातील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहे.
