शेवगावकरांनी ग्रामिण रुग्णालयातच विवाह नोंदणी करावी – डॉ.रामेश्वर काटे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०४ :  ग्रामिण रुग्णालयातील विवाह नोंदणीचे काम पाहणाऱ्या महानंदा जाधव यांचे सतर्कते मुळे शेवगावातील झेरॉक्सच्या टपऱ्या मधून विवाह नोंदणी प्रमाण पत्र मिळत असल्याचा भंडाफोड नुकताच करण्यात आला होता. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अमोल जाधव यांनी वरिष्ठाचे आदेशान्वये शेवगाव पोलिसात या संदर्भात रीतसर तक्रार दाखल केली होती.

विवाह नोंदणी सदर्भात जनसामान्यात जागृती व्हावी कोणीही बोगस विवाह नोंदणी प्रमाणपत्राला बळी पडू नये यासाठी शेवगाव ग्रामिण आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.रामेश्वर काटे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्या प्रसिद्धी पत्रकात अधिक्षक डॉ. काटे यांनी म्हटले आहे की, जनसामान्यानी विवाह नोंदणी करणे आवश्यक असून महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ व नियम १९९९ आणि परिपत्रकाअन्वये शेवगाव शहरातील रहिवासी नागरिकांची विवाह नोंदणी ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक तथा विभाग निबंधक यांचे मार्फत करता येते.

सदर विवाह नोंदणीसाठी शासन निर्णयानुसार विहित कागदपत्रे सादर करून वर-वधू यांनी स्वतः तीन साक्षीदार व पुरोहितासह हजर राहणे आवश्यक आहे. शेवगावचे ग्रामीण रुग्णालय वगळता शेवगाव शहरात अन्यत्र कोठेही विवाह नोंदणी होत नाही. दि.२६ फेब्रुवारी २०२४ ला शेवगाव शहरातून बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर या कार्यालयामार्फत लगेच दि.२७ फेबुवारीला शेवगावात अशा प्रमाणपत्र देणाऱ्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीसांत संबंधित झेरॉक्स चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधिता विरुद्ध ४२० चा गुन्हा दाखल केला आहे.

म्हणून नागरिकांना सजग करण्यात येते की, महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ व नियम १९९९ आणि परिपत्रका अन्वये शेवगाव शहरातील रहिवासी नागरिकांची विवाह नोंदणी फक्त ग्रामीण रुग्णालय शेवगाव या कार्यालयातच होते. या कार्यालयाव्यतिरिक्त बाहेर कोणतीही व्यक्ती, संस्था, एजंट अगर कोणीही विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑफलाइन वा ऑनलाईन अगर स्कॅन करून देत असेल तर ते बेक्रायदेशीर आहे. तरी शेवगावकर  नागरिकांना आवाहन करण्यात येते की, विवाह नोंदणी ग्रामीण रुग्णालय शेवगाव या कार्यालयात करावे.

त्यासाठी विवाहा नंतर तीन महिन्यापर्यंत ८५ रुपये, तीन महिने ते एक वर्षापर्यंत १३५ रुपये व एक वर्षानंतर २३५ रुपये अशी फी आकारण्यात येते. या व्यतिरिक्त कोणताही अधिक खर्च येत नाही. बाहेर कोणीही व्यक्ती, संस्था, एजंट, दलाल म्हणून काम करत असल्यास तसेच रुग्णालयातील कर्मचारी व इतर बाहेरील व्यक्ती पैशाची मागणी करत असल्यास तात्काळ शेवगाव पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचेशी संपर्क करावा असे निवेदनात म्हटले आहे.