कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : आजच्या जगाला आयुर्वेदाचे महत्व पटले असून सर्व जग आयुर्वेदाकडे वळले आहे. सध्या मनाची अशांतता दूर करण्यासाठी दोन पर्याय असून ते म्हणजे “अध्यात्म व आयुर्वेद”. आजच्या जीवनशैलीमुळे तयार झालेल्या सर्व प्रश्नाचे उत्तर आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे. म्हणूनच आयुर्वेद हे समग्र व प्रगल्भ असे शास्त्र आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.संजय कुटे यांनी केले. ते आत्मा मलिक ध्यानपीठ कोकमठाण येथे आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद सेमिनार प्रसंगी बोलत होते.

महाराष्ट्र राज्य अनुदानित आयुर्वेद युनानी महाविद्यालयीन अध्यापक संघ आयोजित ‘राष्ट्रीय आयुर्वेद सेमिनार’ चे उद्घाटन मा.आमदार डॉ.संजय कुटे यांचे हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर धारावीचे आमदार डॉ.ज्योती गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मिलिंद आवारे आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत विश्वानंद महाराज, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, संघटनेचे अध्यक्ष अभय पाटकर, चेअरमन आयोजक अध्यक्ष.डॉ.सुरज ठाकुर, कार्यक्रमाचे सेक्रेटरी, प्रवीण पेटे, NCISM डॉ.नारायण जाधव, MCIM – डॉ.वांगे सर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विघ्यापीठ अधिष्ठाता डॉ.सुरज पोदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार डॉ.ज्योती गायकवाड यांनी आयुर्वेदाची दखल जगाने घेतली आहे. आयुर्वेदास आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व संघटनांनी असेच काम करत राहावे. मी आयुर्वेद महाविद्यालयात १५ वर्षे नोकरी केली म्हणून तुमचे प्रश्न मला माहीत असून ते शासन दरबारी मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आश्रमाचे संत परमानंद महाराज यांनी सांगितले की, आयुर्वेद ही भारतातील ऋषीमुनींनी जगाला दिलेली जीवन पद्धती आहे. जीवनाचे ज्ञान म्हणजे आयुर्वेद आहे आणि जीवनाचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. आयुर्वेद शाश्वत असल्याने ते आज जगमान्य झाले असून आज जग भारताचे अनुकरण करत आहे.

संत विश्वानंद महाराज यांनी प.पू.आत्मा मालिक माऊलींचा आत्मज्ञान प्राप्तीसाठी “ध्यान करो ध्यानी बनो” या संदेश दिला तसेच आयुर्वेदाबरोबर उत्कृष्ट जीवनशैलीसाठी ध्यानाचे महत्व अधोरेखित केले. आयुर्वेद व अध्यात्म हे मानवाच्या जीवनशैलीचे महत्वाचे पैलू आहेत असे यावेळी त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आवारे यांनी या सेमिनारच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे कौतुक केले. तसेच आयुर्वेदामध्ये करिअर करण्यासाठी भविष्यात खूप चांगल्या संधी आहे. या संधीतून समाजाची चांगली सेवा करत रहा. असे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संगीता निंबाळकर, वीणा दिघे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव डॉ.सुरेश पोघाडे यांनी मांडले.
