कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव मतदारसंघासह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील नदी, ओढे, नाले यांना पाण्याचा ओघ वाढला असून अनेक गावांमध्ये नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांच्या घरामध्येही पाणी घुसले आहे.

संसारोपयोगी साहित्य खराब झाल्याने बांधकाम कामगार लाभार्थी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना त्वरित साहित्य घरपोच करून तातडीने मदत करावी आणि सरसकट पंचनामे करून शेतीसह घराचे झालेले नुकसान पाहता भरीव मदत मिळावी अशी मागणी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी आपत्तीग्रस्त भागात पाहणी करताना केली आहे.

अचानक ओढवलेले हे अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट आल्याने संजीवनी उद्योग समूहाचे आपत्ती व्यवस्थापन पथक पूर्णतः सज्ज असून २७ सप्टेबरच्या रात्रीपासूनच नागरिकांना मदत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि शक्यतो अती पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पूर्व भागातील धोत्रे, तळेगाव मळे,तिळवणी,आपेगाव, धारणगाव, टाकळी यासह परिसरातील पाहणी कोल्हे यांनी केली आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे तातडीने आणि सरसकट करण्याची गरज आहे. तसेच येणाऱ्या सण-उत्सवांच्या काळात शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने भरीव आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी व मदतीसाठी स्थानिक यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच आपत्तीत अडकेल्या कुटुंबांना अन्न, पाणी व तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा यासाठी संजीवनी उद्योग समूहाकडून आवश्यक ती सर्व मदत सुरू आहे.
