गौतम बँकेला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : गौतम सहकारी बँकेने बँकेचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने उत्कृष्ट कार्यभार करून अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार पटकाविले असून यामध्ये अजून एका मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे. अहिल्यानगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मर्यादित.,अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ हा पुरस्कार मिळवत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक प्रवीण पावडे यांनी दिली आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणारी बँक म्हणून गौतम बँकेची जिल्ह्यात वेगळी ओळख आहे. बँकेने सर्वच पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामाची वेळोवेळी दखल घेतली जावून आजपर्यंत बँकेने राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवरच्या अनेक पुरस्कारांना गवसणी घातली आहे. मागील आठवड्यातच देश पातळीवरील प्रतिष्ठित असलेल्या ‘बँकिंग फ्राँटियर’ या संस्थेकडून गौतम बँकेला एकाच वेळी दोन नामांकित पुरस्कार देण्यात आले आहे.

यामध्ये आणखी एका पुरस्काराची भर पडून बँकेला अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मर्यादित.,अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ हा पुरस्कार व सोबतच निव्वळ एनपीए चे प्रमाण शून्य टक्के राखल्याबद्दल बीआयएनजीएस व प्रशिक्षण कार्यशाळेत बँकेच्या वतीने जास्तीत जास्त सहभाग नोंदविल्याबद्दल बीआयटीएस असे एकाच वेळी तीन पुरस्कार मिळाले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सहकार पुरस्कार वितरण समारंभात जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जी. एस. महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके व असोसिएशनचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड,व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तिरसे, उपाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी स्वीकारले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी सांगितले की, बँकेच्या पारदर्शक व्यवस्थापन, उत्कृष्ट सेवा सुविधा आणि ग्राहकाभिमुख धोरणामुळे या पुरस्कारासाठी गौतम बँकेला ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामुळे यापुढील काळात अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. यापुढील काळातही आमचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या सूचनेनुसार प्रशासकीय अधिकारी उत्कृष्ट काम करून अजून पुरस्कार मिळवतील असा विश्वास व्यक्त केला.

गौतम बँकेला ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी गौतम बँकेची स्थापना करून परिसरातील व्यवसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. बँकेच्या स्थापनेपासूनच संस्थेचा उद्देश केवळ बँकिंग सेवा देणे नव्हे, तर सर्वसामान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करणे हा राहिला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने, व्यवस्थापनाने आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने व सामाजिक बांधिलकी जपत काम केले, त्याचेच हे फळ आहे.-आ.आशुतोष काळे.

Leave a Reply