कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव शहराजवळील पुणतांबा चौफुलीवर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीची कोंडी होत असल्याने थेट चार किलो मिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागत असल्याने कोपरगाव व परिसरातील नागरीकांना दैनंदिन कामाकाजासाठी ये – जा करणे कठीण होतं असुन शाळकरी मुलांसह अनेकांची हाल बेहाल होतं असल्याचे चिञ आहे.

मंगळवारी दिवसभर कोपरगाव शहरासह पुणतांबा चौफुलीसह अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे ऐन सनसुदीच्या काळात प्रवाशांसह स्थानिक नागरीकांची हाल होत आहे. थोडा वेळ वाहतूक सुरळीत झाली की, पुन्हा दिवसभर कोंडी होवून रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चिञ दिसत आहे. दुरच्या प्रवासाला निघालेले प्रवाशी रस्त्यावर वाहनात अडकुन पडल्याने त्यांचेही अन्न पाण्यावाचून हाल होत आहे. स्थानिक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा एका बाजूला प्रयत्न करेपर्यंत दुसऱ्या बाजूला पुन्हा वाहतूकीची कोंडी होत असल्याने पोलीसांचीही दमछाक होत आहे.

रस्त्याचे अर्धवट काम केल्यामुळे कच्च्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता कमी खड्डे जास्त अशा रस्त्यावरुन अवजड वाहनांची रिघ कायम आहे त्यातच इतर छोट्या मोठ्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावे लागते. साक्षात यमराजासमोर वाहन चालवत असल्याचा साक्षात्कार कोपरगाव येथे आल्यावर जाणिव होते.

तीन दिवसांपासून महामार्गावर वाहतुकीची कोंडी एका बाजुला तर दुसऱ्या बाजुला गोदावरी नदीला पुर स्थिती त्यामुळे छोट्या पुलावरुन पर्यायी रस्ता म्हणून कोपरगावकरांसाठी सोयीचा होता पण तोही पुरामुळे धोक्याचा झाला आहे. गाळ व संरक्षण बॅरीकेट पुराच्या पाण्यामुळे वाहुन गेले अशा अवस्थेत तिथुन वाहतूक करणे जीवघेणी आहे.

गेल्या अनेक वर्षापासून पुणतांबा चौफुली येथील रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरु आहे संबंधीत ठेकूदार रस्त्याचे काम करण्याऐवजी नागरीकांसाठी यमसदनी पाठवण्याची व्यवस्था करतोय की काय अशा शब्दात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या रस्त्यावर दररोज छोटेमोठे अपघात ही नित्याची बाब झाली आहे. आता तर चक्क वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरीकांची हाल होत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी, साई भक्त व इतर सर्व प्रवाशांना कोपरगाव कडे ये-जा करणे म्हणजे एक प्रकारची सजा दिल्यासारखी अवस्था सध्या होत आहे. ञासलेल्या प्रवाशांची नाराजी त्यांच्या तिखट प्रतिक्रियेतून स्पष्ट दिसते. कोपरगाव व शिर्डी मतदार संघात ५ ऑक्टोबर रोजी देशाचे पहीले सहकार मंञी अमित शहा व खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत ते येण्यापुर्वी तरी किमान कोपरगावचा रस्ता व्यवस्थित होईल का? अशी आशा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
