अनेक इच्छुकांची झाली निराशा, ओबीसी मध्ये गुदगुली सुरु
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : कोपरगाव नगरपालीकेच्या पंचवार्षिक निवडणूकीकडे गेल्या चार वर्षांपासून डोळे लावून बसलेल्यांची प्रतिक्षा आता संपत आली असुन अशातच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय पडते व कोणाला निवडणुकीची संधी मिळते याचे आकर्षण शिगेला पोहचले होते.

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत काढले त्यात कोपरगावचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) खुला करण्यात आल्याने ओबीसी प्रवर्गातून नगराध्यक्ष होणाऱ्यांच्या आशा वाढल्याआहेत. तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले खुल्या प्रवर्गातील व अनुसूचित जाती, जमातीतील अनेकांची अपेक्षा भंग झाली आहे. कोपरगावच्या राजकारणात अनेक उलथापालथ झाली. नगरसेवक व नगराध्यक्ष या पदाच्या लालसेपोटी काही कार्यकर्त्यांनी काळे गटात प्रवेश केला तर काहींनी कोल्हे गटात प्रवेश करुन आगामी पालीका निवडणुकीची रणनीती आखली आहे.

कोपरगाव नगरपालीकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवड जनतेतून होणार असल्याने माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमाणे काळे कोल्हे यांच्या उमेदवारीला डावलून आपल्याच मतदार मतदान करतील अशी आशा काहींना आहे. तर काहींना तालुक्यातल्या नेत्यांकडून मलाच संधी मिळणार या आशेवर नगराध्यक्ष पदाचे स्वप्न रंगवत आहेत. सध्या कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रभाग रचने बरोबर प्रभागच्या आरक्षण सोडतीवर राजकीय गोळाबेरीज होणार आहे. कोणत्या भागात कोणत्या प्रवर्गाचे व महीला पुरुष आरक्षण पडते त्यावर सुध्दा राजकीय नेते ऐनवेळी निर्णय घेवू शकतात

दरम्यान कोपरगाव शहरातील राजकीय वातावरण ऐन दिवळीच्या तोंडावर ढवळुन निघणार आहे. कोपरगाव शहरात दिवाळीचे लाडू फुटतात की, कार्यकर्त्यांची फुटाफुटी होते हे लवकरच दिसणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनेक दबा धरुन बसलेल्यांची या आरक्षणामुळे काहींची मोठी अडचण झाली आहे. इतके दिवस नेते कार्यकर्ते यांच्यासाठी धावपळ केली. विविध कार्यक्रम साजरे करून पैशाची उधळपट्टी केली. नगराध्यक्ष पद आपल्याला मिळणार या अपेक्षेने हवं नव्ह ते सर्व केले पण शेवटच्या क्षणाला आरक्षणाने आहे तेही गेले अशी गत झाली.

तर ओबीसी प्रवर्गातील पुरुषासह महिलांना ही संधी असल्याने येथे अनेक ओबीसी प्रवर्गातील कार्यकर्ते आपणच नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहोत असे ठामपणे बोलत आहेत. मीच नेत्यांचा एकनिष्ठ असल्याने मलाच तिकीट मिळणार. मला नेत्यांनी शब्द दिलेला आहे, तेव्हा आपण नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आता चौका चौकात कार्यकर्ते करीत आहेत.

माञ नेते कोणाची निवड करतात आणि कोपरगावची जनता कोणाला निवडून देतात हे आगामी काळात निश्चित होइल. तोपर्यंत एकमेकांची जिरवा जिरव, आडवाआडवी, पाडापाडी, खोडाखोडी, इकडून तिकडे कोलांट उड्या सुरु राहतील. रुसवे फुगवे काढण्यात तालुक्याचे नेते वेगवेगळ्या युक्त्या लढवून आपल्याच गटाचा नगराध्यक्ष कसा होईल यासाठी डाव प्रतिडाव टाकण्याचा प्रयत्न होणार. कोणी कोणताही डाव टाकला तरी आरक्षणामुळे इतर प्रवर्गातील अपेक्षीतांचा हिरमोड झाला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग आरक्षण निश्चित करण्याकरीता बुधवार दि. ८ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात सोडत काढण्यात येणार असुन काढलेले आरक्षण ९ ऑक्टैबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षण सोडतीवर सुचना व हरकती ९ पासुन १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधीत कार्यालयात सादर करावेत असे आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले आहे. तसेच हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असेही ते म्हणाले.
