कोपरगाव पंचायत समितीचे सभापतीपद धामोरी गणाच्या महीलेलाच

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : तालुक्याची मिनी आमदारकी समजलेल्या कोपरगाव पंचायत समितीत महीला राज तर आहेच पण तालुक्याच्या अनेक दिग्गजांचा पत्ता केवळ आरक्षणामुळे कट झाला आहे. सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीच्या महीलेसाठी राखीव असल्याने तिथेही अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणावर आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या अनेकांची संधी या आरक्षणामुळे हुकली आहे. सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीच्या महीलेला आहे. त्यातही केवळ धामोरी गण हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने येथे काहीही करुन महीलेला संधी दिली तरच सभापती महीला होवू शकते त्यामुळे सुरेगाव, ब्राम्हणगाव, शिंगणापूर, पोहेगाव व कोळपेवाडी या दिग्गज राजकारण्यांच्या गणात महीला आरक्षण पडले आहे.

त्यातही सभापती पदासाठी महीला आरक्षण पडल्याने धामोरी गणातही महीला उमेदवार देणे गरजेचे आहे म्हणजे १० गणापैकी ५ गण महीलांसाठी राखीव त्यात पुन्हा सभापती महीला अनुसूचित जमातीचे आरक्षण असल्याने असे १० पैकी ६ महीला पंचायत समितीत निवडून येणार असल्याने पंचायत समितीच्या राजकारणात महीला राज आले आहे तसेच जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी अनुसूचित जमातीची महीला अध्यक्ष होत असल्याने अनुसूचित जमातीच्या महीलांना मोठी संधी आहे.

सोमवार दि. १३/१०/२५ रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात कोपरगाव पंचायत समितीच्या २०२५ पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने गणाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आले. उपजिल्हाधिकारी सायली सोळंके, तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत शाळकरी मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आले.

५ गटाचे तसेच १० गणातील पडलेले आरक्षण व गटास गणातील गावे पुढीलप्रमाणे – सुरेगाव जि. प. गट – (नागरीकांचा मागास प्रवर्ग) १) सुरेगाव गण (सर्वसाधारण महिला) या गणातील गावे पुढील प्रमाणे -सुरेगाव, वेळापूर, हांडेवाडी, मायेगावदेवी, कारवाडी, मंजूर. २) धामोरी गण (अनुसूचित जमाती) या गणातील गावे पुढील प्रमाणे -धामोरी रवंदे, चासनळी, वडगाव, बक्तरपुर, सांगवी भुसार, मोर्वीस माळेगाव थडी, सोनारी. ब्राम्हणगाव गट . जि. प. (सर्वसाधारण) ३) ब्राह्मणगाव गण ( नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला) या गणातील गावे पुढील प्रमाणे – ब्राह्मणगाव, खिर्डी गणेश, धारणगाव, येसगाव, टाकळी, नाटेगाव. ४)करंजी बुद्रुक गण ( नागरीकांचा मागास प्रवर्ग ) या गणातील गावे पुढील प्रमाणे – करंजी, दहेगाव बोलका, पढेगाव शिरसगाव, तिळवणी, आपेगाव, ओगदी, अंचलगाव, बोलकी, बोधेगाव, कासली, सावळगाव.

संवत्सर गट. जि. प. (सर्वसाधारण) ५) वारी गण (अनुसूचित जाती) या गणातील गावे पुढील प्रमाणे -वारी, धोत्रे, भोजडे, लौकी, खोपडी, कान्हेगाव, तळेगाव मळे, घोयेगाव, उक्कडगाव. ६)संवत्सर गण (सर्वसाधारण) या गणातील गावे पुढील प्रमाणे -संवत्सर, सडे, कोकमठाण. शिंगणापूर गट जि.प. ( नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला) ७)शिंगणापूर गण (सर्वसाधारण महीला) या गणातील गावे पुढील प्रमाणे -शिंगणापूर, मुर्शदपुर, डाऊद बुद्रुक, चांदगव्हाण, जेऊर पाटोदा, जेऊर कुंभारी. ८) कोळपेवाडी गण (सर्वसाधारण महीला) या गणातील गावे पुढील प्रमाणे – कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, मढी बुद्रुक, हिंगणी, कोळगाव थडी, कुंभारी, शहाजापूर.

पोहेगाव गट. जि. प. ( सर्वसाधारण महीला) ९) चांदीकसारे गण (सर्वसाधारण) या गणातील गावे पुढील प्रमाणे -चांदेकसारे, शहापूर, घारी, डाऊच खुर्द, मढी खुर्द, देर्डे चांदवड, देर्डे को-हाळे, सोनेवाडी, वेस, सोयगाव. १०) पोहेगाव गण (सर्वसाधारण महीला) या गणातील गावे पुढील प्रमाणे -पोहेगाव, मनेगाव, रांजणगाव देशमुख, धोंडेवाडी, अंजनापुर, जवळके, बहादरपूर, बहादराबाद, काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी. असे असुन तालुक्यातील गावा गावातून जिल्हापरिषद व पंचायत समितीचे सदस्य होण्यासाठी चढाओढ लागणार आहे. तालुक्याच्या दोन्ही नेत्यांसाठी आगमी काळ डोकेदुखी ठरणार आहे. योग्य उमेदवार निवडून तो निवडणुकीत निवडून येईपर्यंत नेत्यांची दमछाक होणार यात शंका नाही.


