कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : खरीप हंगाम संपून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पण रब्बी हंगामात कालव्यांचे आवर्तन सुरु असतांना कोणत्याही अडचणी येणर नाही याची काळजी घेवून कालवे वितरिका दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावी अशा सूचना आ.आशुतोष यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शनिवार (दि.१८) रोजी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून डाव्या, उजव्या व एक्सप्रेस कालव्यावर सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

यावेळी त्यांनी सांगितले की, सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत त्यामुळे नेहमी प्रमाणे चालू वर्षी देखील गोदावरी कालव्यांना समाधानकारक आवर्तन मिळणार आहेत.त्यासाठी शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची जोरदार तयारी सुरु आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.भूजलपातळी समाधानकारक असली तरी सिंचनासाठी आवर्तन सुरु असतांना कुठेही व्यत्यय किंवा अडचणी येणार नाही याची काळजी घ्या.

ज्या ठिकाणी वितरिका उकरणे गरजेचे आहे किंवा त्यातील गवत काढणे गरजेचे आहे त्या ठिकाणी पाहणी करून ती कामे लवकरात लवकर सुरु करा जेणेकरून आवर्तन सोडल्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. मुख्य कालव्यावर काही ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरु आहेत त्या कामांना गती द्या. पाणी गळती होणारी ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी सीमेंट काँक्रिटीकरण, गाळ सफाई वा पॅचवर्क करावा.

शेतकऱ्यांशी समन्वय साधून, कोणत्या भागात किती पाणी लागणार आहे, याचा अंदाज घेऊन योग्य नियोजन करावे. सर्व कामे रब्बी हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच पूर्ण व्हावीत, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळेल. पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केल्यास रब्बी हंगामातील पिकांना फायदा होवून परिणामी शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेचं भान ठेवून कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत अशा सूचना यावेळी आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीसाठी डावा कालवा, उपविभागीय अभियंता कोपरगाव विभागाचे संदीप पाटील, उजवा कालवा, उपविभागीय अभियंता राहाता विभागाचे विवेक लव्हाट, सेवानिवृत्त उपअभियंता तात्यासाहेब थोरात आदी उपस्थित होते.


