कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : कोपरगावमध्ये क्रिकेट स्टंप, लोखंडी रॉड आणि तलवारीचा वापर करून झालेल्या सामूहिक हाणामारी प्रकरणातील मुख्य आरोपी, तसेच विद्यमान आमदाराचा पीए असलेल्या अरुण बाजीराव जोशी याला कोर्टाने जोरदार झटका दिला आहे! कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी जोशीचा नियमित जामीन अर्ज गंभीर निरीक्षणे नोंदवत फेटाळून लावला आहे. तपास सुरू असताना आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, या युक्तिवादावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

२४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११:४५ च्या सुमारास मोहिनीराजनगर येथे ही गंभीर घटना घडली. आरोपी अरुण जोशीने आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमाजवळ फिर्यादी विवेक आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (आई हिराबाई, बहीण आरती, पुतण्या सिध्दू गिते आणि योगिता पाटणकर) यांच्या कारला अडवण्यात आले. आरोपी अरुण जोशी आणि सहआरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना क्रिकेट स्टंप, लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि तलवार यांसारख्या जीवघेण्या शस्त्रांनी मारहाण केली.

आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा आरोप एफआयआरमध्ये आहे. या हल्ल्यात सिध्दू गिते, फिर्यादी, त्यांची आई आणि बहीण जखमी झाले. सिध्दू आणि फिर्यादींना डोक्याला जखमा झाल्या, तर अविनाश गिते यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. आरोपींनी हिराबाई यांच्या गळ्यातील १ तोळ्याची सोन्याची गाठण आणि फिर्यादीची १ तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावली.

आरोपीवर भा.न्या.सं.मधील कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. अरुण जोशी हा कोपरगावच्या विद्यमान आमदाराचा स्वीय सहाय्यक असल्याने तो अत्यंत प्रभावशाली व्यक्ती आहे. यामुळे तो तपास प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकतो किंवा ज्या साक्षीदारांचे जबाब अजून नोंदवायचे आहेत, त्यांच्यावर दबाव आणू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली. आरोपीने स्वतः शरणागती पत्करल्यानंतरही पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी न मागता थेट न्यायालयीन कोठडी मागितली. यावरून पोलिसांकडून आरोपीला मदत केली जात असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीच्या वकिलांनी केला.

न्यायाधीशांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर, आरोपीवरील आरोप गंभीर असल्याचे आणि घटनेत आरोपीचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट केले. “गुन्ह्याचे गंभीर स्वरूप आणि आरोपी प्रभावशाली व्यक्ती असल्याचे लक्षात घेता, चालू तपासात अडथळा आणण्याची किंवा साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे परखड मत न्यायालयाने नोंदवले. यामुळे, न्यायमूर्तींनी आरोपी अरुण बाजीराव जोशी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि अर्ज निकाली काढला.


