कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : टाकळी फाटा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला जीव गमवावा लागला असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. नुकताच साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच घडलेली ही दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक आहे.

या घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी नगर–मनमाड महामार्ग ठिय्या आंदोलन करून बंद पाडला आहे. प्रशासन आणि वनविभागाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने या परिसराला ‘बिबट्या प्रभावित क्षेत्र’ घोषित करण्याची मागणी केली आहे.

स्नेहलता कोल्हेंनी वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा वनरक्षक अधिकारी सालविठ्ठल, तहसीलदार महेश सावंत, तसेच वनाधिकारी रोडे यांच्याशी चर्चा करून तातडीने नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पिंजरे लावून सतत गस्त घालावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

कोल्हेंनी मयत महिलेच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून प्रशासनाला आक्रमक पद्धतीने सूचना केल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांना स्वसंरक्षणासाठी आवश्यक साधने आणि जागृती कार्यक्रम देण्यात यावेत, असेही आवाहन प्रशासनाला केले आहे. नागरिकांच्या जीवितासमोर कोणतीही शासकीय यंत्रणा निष्क्रिय राहू नये. तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि हा नरभक्षक बिबट्या ठार करा अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी फोनवरून मंत्री महोदयांकडे व्यक्त केले आहे.


