काका कोयटेंचे नाव जाहीर करून निवडणुकी पुर्वीच काळेंनी कोल्हेंना दिला धक्का

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव नगरपालीकेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांची खेळी कोल्हेंना धक्का देणारी ठरली असुन निर्विवाद निवडून येणारे प्रभाग ३ चे कोल्हे गटाचे उमेदवार जनार्दन कदम यांना काळेंनी आपल्या गटात खेचुन आणले. तर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी काका कोयटेंना जाहीर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.‌

कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता की, राज्य , देश विदेश पातळीवर सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्य करणारे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे  हे नगराध्यक्ष  पदाच्या निवडणुकीत उतरतील, पण आमदार आशुतोष काळे  यांच्या उपस्थितीत अजित पवार  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  कोयटेंचा प्रवेश  घेत आमदार काळेंनी काका कोयटे हे कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या गटाचे  नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

 गुरुवारी दुपारी १२ वाजता शहरातील कृष्णाई  मंगल कार्यालयात आमदार काळे यांनी पञकार परिषदेचे आयोजन केले. याचवेळी काका कोयटे यांना सोबत घेवून आले. काका कोयटे यांचा पक्ष प्रवेश करुन घेत नगराध्यक्ष पदाचे हेच उमेदवार आहेत असे सांगताच उपस्थित समर्थकांनी जल्लोष केला तर काहींनी मुकसहमती देत कोयटेंचे मोठ्या दिलाने स्वागत केले.

यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, नगराध्यक्ष पदासाठी आपल्या पक्षातील अनेक इच्छुक  उमेदवार होते  त्यांच्या मला समजतात  भविष्यात जशी संधी उपलब्ध होईल तशी संधी सर्वांना देणार आहे. आता या निवडणुकीत काका कोयटे यांच्यासाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी असणार आहे. येत्या एक दोन दिवसात नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करणार आहोत. असे म्हणत काका कोयटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांचे विषेश स्वागत काळेंनी केले. 

 यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे  नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे  यावेळी बोलताना म्हणाले की, आमदार काळे हे व्हिजन असणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल. यापुर्वीही माझी पत्नी सुहासिनी कोयटे यांना नगराध्यक्ष पदाची संधी माजी खासदार स्व. शंकरराव काळे यांच्यामुळे मिळाली होती आता पुन्हा माझी नगराध्यक्ष होण्याची इच्छाही काळे यांच्यामुळे पुर्ण होत आहे. मी आज महत्वाच्या प्रसंगातून जातोय. 

 माझ्या ५० वर्षांच्या राजकीय कार्यकाळात  मला नगराध्यक्ष  होण्याचा योग आलानाही म्हणून गेल्या २५ वर्षापासुन राजकारणातून थांबलो होतो.  कोपरगावची बाजारपेठ वाढवण्याची मनात इच्छा आहे. मी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर  पतसंस्था संघटनेचे काम करतोय तरीही गावा ते गावच आहे. मला कोपरगावा बद्दल आस्था आहे. कोपरगावची नवी ओळख करुन द्यायची आहे. आमदार आशुतोष काळे यांना सहकार्य करायचे आहे. 

काळेंचे कार्यकर्ते दिलदार मनाचे आहेत माझ्यासाठी  त्यांनी माघार घेतली. मला संधी मिळाली पण तो विक्रमी विजय करुन दाखवणार. सर्व नगरसेवक निवडून आणणार. निष्ठावंतावर अन्याय न करता इनकमिंगचा विचार करावे असे सांगत यापुढे माझं आयुष्य कोपरगावसाठी समर्पित राहील. मी मोठमोठे कामे करण्यासाठी माझा वापर करा. निधी आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात कोपरगाव एकच नंबर करायचे आहे. पालकमंत्र्यांचे आपल्याला चांगलं सहकार्य आहे. असे म्हणत विविध योजनांचा आराखडा कोयटेंनी यावेळी सांगितले. 

माजी नगरसेवक जनार्दन कदम यांच्या येण्याने काळे गटाची ताकत वाढली आहे. यावेळी सतिश कृष्णानी, सुनिल गंगुले, डॉ. अजय गर्जे, विरेन बोरावके, जनार्दन कदम धरमचंद बागरेचा, टेकचंद खुबानी, अजित लोहाडे, सुधीर डागा, संदीप कोयटे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 कोल्हे यांच्या भाजप आरपीआय व मिञ पक्षाच्यावतीने पराग संधान हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून आमदार काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काका कोयटे यांचे नाव जाहीर झाल्याने हि निवडणूक तुल्यबळ तर होणारच पण अपक्ष कोण कोण मैदानात उतरणार याकडे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply