विखेंचे खंदे समर्थक काका कोयटेंनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : कोल्हे यांच्या राजकारणाला सुरुंग लावण्याची एकही संधी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कधीच सोडली नाही. आत्ताही नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नगरपालीकेच्या निवडणुत ताकतीने भाजपची सत्ता आणण्यासाठी उतरले आहेत.

कोल्हेंनी भाजप व मिञ पक्षांची लोकसेवा आघाडी करून पराग संधान यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करताच कोल्हे यांची राजकीय ताकत कमकुवत करण्याची खास यंञणा विखेंनी राबवली आणि कधीच आपल्या शब्दांच्या पुढे न जाणारे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे हे पालकमंत्र्यांचे विश्वासु सहकारी आहेत. कोयटे यांच्यासाठी हवं ते करणारे विखे पाटील हे कोयटेंचे तारणहार आहेत हे सर्वश्रुत असताना कोयटे विखेंच्या सहमतीशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधतील का? आमदार आशुतोष काळे यांना कायम विखे पाटील यांचं सहकार्य असतं हेही सर्वांना ज्ञात आहे.

आता कोपरगाव नगरपालीकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे मोठ्या ताकतीने उतरुन काका कोयटे यांच्या सहकार्याने पालीकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा चंग बांधला आहे. आज झालेल्या पञकार परिषदेत खुद्द काका कोयटे यांनी कबुली दिली की, पालकमंत्री यांचे पाठबळ आपल्याला कायम आहे त्यांचे सहकार्य आहे असे सांगितल्यामुळे पालकमंत्री विखे पाटील हे आपल्याच भाजप पक्षाच्या उमेदवारांना पराभव करण्याची तयारी तर करीत नाहीत ना? किंवा केवळ कोल्हेंना विरोध करण्यासाठी विखे यांनी हि नवी खेळी तर नाही ना ? असे अनेक प्रश्न कोपरगाव करांना पडले आहेत.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत थोरात व कोल्हे यांनी विखेंचा पराभव केल्यामुळे तो वचपा काढण्यासाठी विखेंनी ही खेळी खेळली असेल अशीही चर्चा कोपरगाव मध्ये रंगली आहे. काहीही झाले तरी प्रसंगी विरोधी पक्षाला मदत करु पण आपल्याच पक्षातील नेत्यांना मदत करायची नाही असं काही विखेंचे गणितं असेल काय? पालकमंत्री विखे पाटील भाजपचे असल्याने या निवडणुकीत कोल्हे यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येतील की, आमदार काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी येतील याची उत्सुकता लागली आहे.

काहीही झाले तरी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत खेचुन काळेंनी मोठी राजकीय खेळी खेळल्यामुळे कोल्हे यांची मोठी कोंडी केली आहे. कोल्हे यांनी जाहीर केलेले प्रभाग ३ मधील उमेदवार जनार्दन कदम हे काल पर्यंत कोल्हे गटाशी एकनिष्ठ होते त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि अचानक कदम हे गुरुवारी आमदार काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केल्याने कोल्हे यांना आता पुन्हा प्रभाग तीनमध्ये उमेदवार शोधण्याची वेळ आणली आहे.

प्रभाग तीन मध्ये कोण उमेदवार असणार याचीही उत्सुकता लागली आहे. आमदार काळे यांच्या राजकीय डावपेचाची जोरदार चर्चा सुरु आहे निवडणूकीच्या अंतिम क्षणापर्यंत कोल्हे गटाच्या कोण कोणाला आमदार काळे हे गळाला लावतील याची कुजबुज सुरु झाली. कोल्हेंचे अजून किती उमेदवार काळेंच्या गटात जातात याची चर्चा आता रंगत आहे. पण काहीही झालं तरी विखेंची वक्रदृष्टी कोल्हेवरच आहे की काय? असा सवाल अनेकांना पडत आहे. काळे- कोल्हेंच्या राजकीय आखाड्यात विखेंचे इंट्री लक्ष वेधी ठरणार आहे.


