कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : सख्ये बहीण भाऊ मेंढ्यांना पाणी पाजवण्यासाठी दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात मेंढ्या सोडल्या माञ एक मेंढी पाण्यात पडल्याने तीला वाचवण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने बहीण भावाचा बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे काल दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शासकीय जागेतील जुन्या दगडाच्या खाणीजवळ मेंढ्या चारत होते. जवळच खाणीत पाणी असल्याने पाणी पाजवण्यासाठी मेंढ्या घेवून सार्थक गणपत बडे वय १९ वर्षे व त्याची बहीण सुरेखा गणपत बडे वय १८ वर्षे हे गेले असता एक मेंढी पाण्यात बुडत असताना तीला वाचविण्याच्या नादात या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. हे तालुक्यातील डाऊच खुर्द येथील रहीवाशी आहेत.

सर्वात अगोदर सुरेखा ही मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखाने प्रयत्न केले. मात्र तिला वाचवण्याच्या नादात सुरेखाचा तोल जाऊन पाय घसरला. सुरेखा पाण्यात पडली व बुडायला लागली हे लक्षात येताच भाऊ सार्थक बडे यांनी तिला वाचवण्यासाठी खाण्यात उडी घेतली. मात्र खाणीमध्ये जास्त पाणी असल्याने व दोघेही घाबरल्याने ते पाण्यात बुडाले.

आजूबाजूला काही महिला कपडे धुण्यासाठी थांबलेल्या होत्या त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने जवळ असलेल्या नागरिकांना याबाबत कळवले. पोलीस पाटील मीराताई रोकडे डॉ. गोरक्षनाथ रोकडे, उपसरपंच वसिम शेख यांनी सदर घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना दिली. डाऊच खुर्दचे माजी सरपंच संजय गुरसळ यांनी तरुणांना सोबत घेत घटनास्थळ गाठले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णवाहिकेतून हे मृतदेह पाठवण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही पार्थीवावर शोकाकुल वातावरणात डाऊच खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कुकडे करीत आहे.


