शेवगाव प्रतिनिधी, दि.१७ : शिर्डी येथे होणाऱ्या “शासन आपल्या दारी” कार्यक्रमासाठी शेवगाव आगारातील २९ तर गेवराईहून बोलाविलेल्या १५ अशा एकूण ४४ बसेस सोडण्यात आल्याने शेवगाव आगारात काहीसा शुकशुकाट होता.
शेवगाव आगारातून सुमारे २००० लाभार्थी स्त्री-पुरुष व त्यांची व्यवस्था पहाणारे कर्मचारी शिर्डीच्या कार्यक्रमाला गेले.
जिल्ह्या बाहेरच्या आगारातून येणाऱ्या लांबपल्याच्या गाड्या व स्थानिक २४ बसेस फक्त चालू होत्या. शेवगाव आगाराच्या ५३ एसटी बसेस विविध ठिकाणी रोज ३२० फेऱ्या करतात. मात्र आज सायंकाळपर्यंत अवघ्या पन्नास फेऱ्या झाल्या आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागात रोज १८ एसटीबसेस मुक्कामी जात असतात. या कार्यक्रमामुळे काल या मुक्कामी बसेस सोडण्यात आल्या नाहीत. तसेच सकाळीच सोडण्यात येणार्या १५ बसेस देखील सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सकाळी शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत झाली.
या विद्यार्थ्यांना पदरमोड करून खाजगी वाहनाने यावे लागले. तर काहींवर सक्तीने दांड्या मारण्याची पाळी आली. तसेच नोकरी व्यवसायामुळे जिल्ह्यातच रोज ये-जा करणाऱ्या शेकडो चाकरमागण्यांना व व्यावसायिकांना या अडचणीला तोंड देण्याची वेळ आली.