कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. बऱ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत महायुतीतील पक्षात प्रवेश केला आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा दणका देत 45 वर्षे उद्धव ठाकरेंची साथ देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे व उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतांना म्हणाले की, ही स्व. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे.

राजेंद्र झावरे यांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेशाने कोपरगाव तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अनेक प्रवेश इथून पुढेही होणार आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे येथे कार्यकर्त्यांना जीव लावून न्याय दिला जातो. 2001 च्या निवडणुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत होणार असल्याचा ठाम विश्वासही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांचाही शिवसेनेत प्रवेश शिंदे सेनेत झाला आहे. राजेंद्र झावरे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगरचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,सोमनाथ शिंगाडे, विधानसभा प्रमुख किरण खर्डे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, उप शहरप्रमुख विकास शर्मा, शेखर कोलते, बाळासाहेब साळुंखे, राहुल देशपांडे, अमजद शेख, सतीश शिंगाणे, वैभव गीते, विजय सोनवणे, विजय शिंदे, वर्षाताई शिंगाडे, सलीम कांदेवाले, अरुण बोर्डे,सुनील कुढारे, जाफर सैय्यद, सनी काळे आदी पदाधिकार्यांसह 700 कोपरगाव तालुका रिक्षा व टॅक्सी संघटना सभासद यांनी राजीनामे देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत झावरे यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यावेळी जिल्हा प्रमुख नितीन औताडे, तालुका प्रमुख मनील नरोडे, शहर प्रमुख अक्षय जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. झावरे यांच्या प्रवेशानंतर कोपरगावमध्ये शिवसेनेची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरत आहे.

राजेंद्र झावरे हे गेल्या 45 वर्षांपासून शिवसेनेत होते. राजेंद्र झावरे यांनी उबाठा सोडतांना दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, ‘मी 45 वर्षांपासून शिवसैनिक आहे. शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, लोकनियुक्त नगराध्यक्ष, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशी विविध पदे सांभाळण्याची संधी मला मिळाली. माझ्या मनात आपल्याबद्दल मनात प्रचंड आदर आहे. परंतु आता आपल्या पक्षात काम करणे शक्य नाही.’ दरम्यान, राजेंद्र झावरे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना प्रवेशाने कोपरगावमधील राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे.


