इतिहासाने तुमची नोंद घ्यावी असे जगा – प्रा.गणेश शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०२ : वडिलांकडून तुमची ओळख होण्यापेक्षा तुमच्यातून वडिलांची ओळख झाली पाहिजे. वाईट मार्गाने कमावलेली पैसे प्रेतावरची फुले असून आयुष्यात प्रामाणिक काम करतांना इतिहासाने तुमची नोंद घ्यावी असे जगण्याचा मौलिक सल्ला प्रा.गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.  

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रा. गणेश शिंदे उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ते बोलत होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा.शिंदे पुढे म्हणाले की, उदरनिर्वाह ही शिक्षणातली प्राथमिक अवस्था असून फक्त फॉरमॅलिटी म्हणून अभ्यासाकडे बघू नका. तुमच्यात प्रचंड कौशल्य आहेत, पण ते कौशल्य डोळे विस्फारून पाहण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने चौकटीच्या बाहेर जाऊन जगले पाहिजे आणि तुमच्यातून स्वाभिमान पिढी जन्माला आली पाहिजे. शिक्षणातून आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण निर्माण झाले पाहिजे असे मत मांडले.

व्याख्यानाचा शेवट करताना “काय सांगू राणी मला गाव सुटेना” या गाण्याच्या ओळीतून विद्यार्थ्यांना दंग करून टाकले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या की, आजच्या युगात केवळ डिग्री घेऊन चालत नाही तर विविध व्यावसायिक कौशल्य ही आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला असून संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असून यामध्ये विद्यार्थिनींची संख्या देखील मोठी आहे.

यावरून सुशीलामाई यांनी मुलींच्या शिक्षणाचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले असले सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा लेखा-जोखा मांडला. यावेळी विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात येवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

दुपारच्या सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करून आपल्या कला गुणांनी उपस्थितांना मंत्र मुग्ध केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सागर मोरे व प्रा. उमाकांत कदम यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक विशाल पोटे यांनी आभार मानले.