वसीम शेख यांच्यामुळे प्रभाग ८ मध्ये मिळणार बळ
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्र पक्ष आघाडीच्या विजयाची घोडदौड दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत आहे. संघटीत नेतृत्व, ठोस नियोजन आणि सर्व पातळ्यांवरील सशक्त प्रचारयंत्रणा यामुळे आघाडीच्या उमेदवारांचा जनसंपर्क मोहीमेला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या लोकप्रियतेचा थेट परिणाम म्हणून विविध पक्षातील असंतोष आणि प्रवेश भाजपमध्ये सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.

याच प्रवाहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रभावी युवा कार्यकर्ते वसीम शेख यांनी कलश मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश मा. आ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे, तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

वसीम शेख यांनी सांगितले की, कोपरगावच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे कोल्हे कुटुंब, त्यांची प्रामाणिक कार्यशैली आणि नागरिकांप्रती असलेली बांधिलकी पाहून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आगामी नगरपरिषदेला सक्षम, विकासाभिमुख नेतृत्व देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.

या प्रवेशामुळे कोपरगावमध्ये भाजपा मित्रपक्षांचा आत्मविश्वास आणखी दृढ झाला असून विरोधकांमधील नाराजी आणि गोंधळ अधिक प्रकर्षाने दिसू लागला आहे. काका कोयटे व आ. काळे यांच्या नेतृत्वाखालील गटातून सुरू असलेली पाठ फिरवण्याची मालिका सुरू आहे तर कोल्हे गटात ओघ सुरू आहे. नागरिक विकासाकडे आणि स्थिर नेतृत्त्वाकडे झुकत असल्याचे हे स्पष्ट द्योतक आहे. या कार्यक्रमाला सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कोपरगावच्या आगामी राजकारणात हा प्रवेश निर्णायक ठरेल, असा विश्वास भाजप आरपीआय आघाडीने व्यक्त केला आहे.


