कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्याकडे वेगाने जात असताना भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या विजयाची गती अधिकच वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका चालक-मालक संघटनेने भाजपा मित्रपक्षांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आपली ताकद एकवटली आहे. संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या भाजपा व मित्रपक्षांना समर्थन जाहीर केले.

यावेळी बोलताना चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पराग संधान हे सर्वसामान्यांमधून पुढे आलेले उमेदवार असून ते चालक बांधवांना चांगले परिचित आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात अनेक चालक बांधव भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी उत्सुक असून हा विजय ऐतिहासिक व्हावा, या उद्देशाने आम्ही आज हा पाठिंबा जाहीर करत आहोत. कोपरगावच्या विकासासाठी आणि स्थिर, सक्षम नेतृत्वासाठी भाजपा व मित्रपक्षांचा विजय आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी युवानेते विवेक कोल्हे यांनी संघटनेचे स्वागत करताना सांगितले की, जगातील सर्वात मोठा पक्ष आणि तालुक्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांच्या अडीअडचणींमध्ये कायम उभी राहिली आहे. संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून चालक-मालकांना सोबत घेऊन जाण्याचे काम सुरू आहे.

चालक बांधवांच्या समस्या सोडवणे, सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या 21 तारखेला कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत “31-0” असा दणदणीत निकाल लावत विजयाचा गुलाल उधळला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी कोपरगाव तालुका चालक-मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


