शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला लागलेल्या आगीत सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र प्रकल्पाचे कोटयावधीचे आर्थिक नुकसान झाले. तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी प्रकल्पाच्या नुकसानीची माहिती घेऊन अशा संकट प्रसंगी शेतकरी संघटना, गंगामाई कारखाना प्रशासना बरोबर असल्याची ग्वाही दिली.
इथेनॉल प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे साखर कारखान्याची गव्हाण बंद पडली. ऊस घेऊन आलेल्या बैलगाडया, ट्रॅक्टर, ट्रका आदि वाहने अडकून पडल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाली. मात्र या परीस्थितही कारखाना प्रशासनाने उस उत्पादक शेतक-यांचे आर्थिक भवितव्य लक्षात घेवून बंद पडलेले गाळप तातडीने पुन्हा सुरु करून शेतक-यांना मोठा आधार दिला.
यावेळी स्वभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे म्हणाले, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, कारखान्याचे चेअरमन मधुकर अण्णा मुळे व कार्यकारी संचालक रणजीत मुळे यांनी अतिशय संयमाने व धैर्याने ह्या बिकट परिस्थितीला हाताळले असून कारखाना २४ तासाच्या आत पुन्हा सुरू करून शेतकरी व कामगार हिताचा निर्णय घेतला.
कारखाना प्रशासन किती गतिमान व धाडसी आहे याचे प्रत्यंतर आले. येथील शेतकरी, शेतकरी संघटना, कामगारवर्ग हे कदापि विसरणार नाही. कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विष्णू खेडेकर, प्रशासकीय अधिकारी अर्जुन मुखेकर आदिंनी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लवांडे, यांच्यासह मच्छिंद्र आर्ले, बाळासाहेब फटांगडे, अशोक भोसले, अमोल देवडे, दादासाहेब टाकळकर, अतुल म्हस्के, लक्ष्मण पालवे आदीं संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.