कोपरगाव नगरपालिकेसाठी सरासरी ७० टक्के मतदान

भाजप, राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने सामने, बाचाबाची वगळता मतदान शांततेत

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे, सहायक अधिकारी महेश सावंत, सुहास जगताप यांनी दिली. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार, कार्यकर्ते काही ठिकाणी आमने सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. बाचाबाची, कुरबुरी व किरकोळ तक्रारी वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. काही मतदारांचे मतदान दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्यांचा गोंधळ उडाला.संध्याकाळी उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर मतदान सुरू होते.

सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत ७.४२, साडे अकरापर्यंत १८.६२ ,दीड वाजता ३२.५९ साडे तीन वाजता ४८.५४ टक्के मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे सहायक निर्णय अधिकारी महेश सावंत, सुहास जगताप व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवले. निवडणूक निरीक्षक ओंकार पवार यांनी सेवा निकेतन येथील आदर्श मतदान केंद्राला भेट देवून माहिती घेतली.

अधिकारी सुहास जगताप यांनी सुमनबाई परदेशी (वय ८५)या जेष्ठ  महिला मतदाराचे पुष्प देऊन स्वागत केले. एस .जी विद्यालय, जुने सायन्स कॉलेज, बैल बाजार येथील मतदान केंद्रावर भाजप, राष्ट्रवादीचे उमेदवारांमध्ये बाचाबाची होऊन वातावरण तणावाचे झाले होते. कुठेही ईव्हीएम मशीनची तक्रार आली नाही.

शहरातील सर्व प्रभागांमध्ये पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व पथकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला होता.सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रांवर मतदारांची लक्षणीय गर्दी दिसून आली. सायंकाळपर्यंत मतदारांची उपस्थिती वाढली. महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण मतदारांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठीच्या ५ तर नगरसेवकपदासाठी १२२ उमेदवार, असे एकूण १२७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या सकाळी दहा वाजता सेवा निकेतन स्कूलच्या प्रांगणात मतमोजणी होणार आहे. निवडणूक निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मतदान सुरु असताना आमदार आशुतोष काळे, चैताली काळे, काका कोयटे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पराग संधान, विजय वहाडणे, उमा वहाडणे, भरत मोरे, तसेच राजेंद्र झावरे यांनी विविध मतदान केंद्रांवर भेट देत आढावा घेतला. शांततेत मतदान करण्याचे आवाहन केले. आता मतमोजणीच्या दिवसाची उत्सुकता शहरात शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply