कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कारखानदार, उस उत्पादक शेतकरी आणि वाहतुक यामधील महत्वाचा दुवा उस वाहतुकदार चालकांचा असुन, जुगाडाद्वारे होणा-या वाहतुकीतुन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तेव्हा उस वाहतुकदार चालकांनी रस्ते सुरक्षेचे सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून सुरक्षीत वाहतुकीला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन श्रीरामपुर कार्यालयाचे पोलिस उप वाहन निरीक्षक अनिल दुर्गे यांनी केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उस वाहतुक करणा-या बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर, जुगाड चालक मालक यांचे एकदिवसीय सुरक्षा शिबीर घेण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य शेतकी अधिकारी एन. डी. चौधरी होते.

प्रारंभी उप मुख्य शेतकी अधिकारी सी. एन. वल्टे प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे, उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी रस्त्यावरून उस वाहतुक करणा-या सर्व वाहनधारकांच्या व्यक्तीगत सुरक्षे बरोबरच मोफत आरोग्य तपासणीचीही काळजी घेत असल्याचे सांगितले. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी रमेश डांगे यांनी सर्व वाहनधारकांना कापडी रिफलेक्टर कारखाना यंत्रणेमार्फत उपलब्ध करून दिल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

दुर्गे पुढे म्हणाले की, श्रीरामपुर वाहन कार्यालयाचे मोटारवाहन निरीक्षक निरंजनसिंग परदेशी यांनी जिल्हयात प्रत्येक साखर कारखान्याच्या उस वाहतुकीचे सुयोग्य पध्दतीने नियोजनाबाबत आढावा घेवुन वाहन विभागाच्या सर्व अधिका-यांना सुचना व उपाययोजनाबाबत माहिती दिली आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील उस वाहतुक करणा-या सर्व वाहनधारकांनी रस्त्यावरून उसाची कारखान्यापर्यंत ने आण करतांना आवश्यक ती काळजी घ्यावी, वाहतुकीदरम्यान कर्णकर्कश गाणी वाजवु नये, क्षमतेपेक्षा जादा उसाची वाहतुक करू नये, बैलगाडीस दर्शनी भागावर तर ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली, जुगाड यांच्या मागील बाजुस कापडी रिफलेक्टर अवश्य लावावे जेणेकरून रात्री अपरात्री वाहतुक करतांना होणारे अपघात टाळता येतील.

ट्रॅक्टर जुगाडातुन उस वाहतुकीदरम्यान रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्याबाबत १ जानेवारी पासुन कडक नियमांची अंमलबजावणी केली जाणार असून सुरक्षित उत्सवात केला प्राधान्य देण्यात येणार आहे तेंव्हा सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केनयार्ड सुपरवायझर दिपक जगताप, दशरथ भवर व त्यांच्या सर्व सहका-यांनी केले. सुरक्षा अधिकारी रमेश डांगे यांनी आभार मानले.


