कोपरगाव प्रतिनिधी, दि. 29/7/2026 : चालु खरीप हंगामात कोपरगांव मतदारसंघात अद्यापही पुरेशा प्रमाणांत पाउस नाही, नाशिक, त्रंबकेश्वर, घोटी परिसरात चांगले पर्जन्यमान होत असल्यांने जायकवाडी धरणाचा साठा ६५ टक्केच्या जवळपास झाला आहे, गोदावरी नदीला मोठया प्रमाणांत पाणी सोडले जात आहे तेंव्हा गोदावरी उजव्या व डाव्या कालवा लाभक्षेत्रातील कोपरगांव मतदारसंघातील गांवतळी, पाझरतलाव, साठवण बंधारे, मातीचे बंधारे ओव्हरफलोच्या पाण्याने भरून द्यावे अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभाग, कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग यांच्याकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अहिल्यानगर-नाशिक विरूध्द मराठवाडा या प्रादेशिक पाणी वादात मेंढेगिरी समितीची जायकवाडीची ६५ टक्के पाणी साठ्याची अट होती त्यावर नव्यांने नेमलेल्या मांदाडे समितींने ती कमी केली आहे. सध्या नाशिक, घोटी, इगतपुरी, त्रंबकेश्वर परिक्षेत्रात चांगल्या प्रमाणांत पाउस होत असल्याने गोदावरी नदीतुन मोठया प्रमाणांत पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ६५ टक्केच्या आसपास झाला आहे. तेंव्हा गोदावरी उजवा व डाव्या कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी सोडुन त्याद्वारे कोपरगांव मतदारसंघातील गांवतळी, पाझरतलाव, साठवण बंधारे, मातीचे बंधारे भरून द्यावे अशी असंख्य लाभधारक शेतक-यांसह नागरिकांनी मागणी केलेली आहे.

कोपरगांव मतदारसंघ चालु खरीप हंगामात अद्यापही पुरेशा प्रमाणांत पाउस नाही त्यामुळे बहुतांष विहीरींना पाणी उतरलेले नाही. गोदावरी ओव्हरफलोचे पाणी कालव्यांमार्फत फिरल्यास त्याचा शेतक-यांसह नागरिकांना फायदा होतो. शेतक-याकडील पशुधन व पुर्व भागातील दुष्काळी गांवचे रहिवासीयांना पिण्यांचे पाण्याचा तुटवडा सध्या भासत आहे. तेंव्हा शासनाने व जलसंपदा विभागाने शेतक-यांच्या मागणीकडे तात्काळ लक्ष देवुन कोपरगांव मतदारसंघातील गांवतळी, पाझरतलाव, साठवण बंधारे, मातीचे बंधारे गोदावरी ओव्हरफलोच्या पाण्यांने त्याचप्रमाणे पालखेड कालव्याचे ओव्हरफलोचे पाण्यांतुन कोपरगांवच्या पुर्व भागातील कोळनदीवरील सर्व बंधारे भरून द्यावे असे आमदार कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.


