शेवगाव प्रतिनिधी, दि. ३०: तालुक्यातील घोटण येथील ३३ केव्हीए उपकेंद्रातील ५ एम व्ही ए पावर ट्रान्सफार्मरला बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी पाथर्डी नगरपरिषद व गंगामाई साखर कारखान्याचे अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात संबधितांना यश मिळाले. आग व धुराच्या प्रचंड लोटामुळे परिसरात काही काळ चिंतेचे व घबराटीचेवातावरण पसरले होते.
या उपकेंद्राच्या परीसरात ५ एमव्हीए चे ४ ट्रान्सफार्मर कार्यान्वीत असून पैकी ५ एमव्ही ए च्या एका ट्रान्सफार्मरमध्ये ऑइल गळती होवून ही आग लागली असावी असा अंदाज वीज वितरण कंपनीचे शेवगावचे उपअभियंता एस.एम लोहारे यांनी व्यक्त केला.
वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता काकडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटील यांनी घोटण उपकेंद्रास भेट देवून घटनेची माहिती घेतली. लागलेल्या या आगीमुळे संबधित ट्रान्सफार्मर वरील वीज पुरवठा अन्य ट्रान्सफार्मरवर वळविण्यात येवून त्या गावात सुरळीत वीज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती उपअभियंता लोहारे यांनी दिली.