शेकडो दात्यांनी केले रक्तदान
कोपरगाव प्रतिनिधी दि. १७ : कोपरगाव येथील स्व. भागचंद धनराज ठोळे यांच्या स्मरणार्थ व लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगांव, ज्येष्ठ नागरीक सेवा मंच, ठोळे उद्योग समुह, व प्रवरा मेडीकल ट्रस्ट लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन तहसीलदार विजय बोरुडे,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, ठोळे उद्योग समूहाचे कैलास ठोळे, राजेश ठोळे, मुनिष ठोळे, आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे म्हणाले की, आपल्या कोपरगाव शहरात ठोळे उद्योग समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या या सर्व रोग निदान शिबिराला नागरिकांनी मोठया प्रमाणावर सहभाग नोंदवून उपचार घेत आहेत. ठोळे समूहामुळे सर्वसामान्य नागरिकांना शिबिराच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे.यासारखे शिबिर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घेतले तर नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल असे म्हणत ठोळे उद्योग समुह नेहमी जनहीताच्या कल्याणकारी कार्यात अग्रभागी असल्याने तहसीलदार बोरूडे यांनी कैलास ठोळे यांचा सन्मान करुन ठोळे परिवाराचे विशेष कौतुक केले.
यावेळी कैलास ठोळे म्हणाले की, २४ वर्षापूर्वी भागचंद ठोळे यांनी एकाच ठिकाणी कोपरगावकरांना सर्व आरोग्य तपासण्या करता याव्यात, असलेल्या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या शिबिराची परंपरा ठोळे उद्योग समूह चालवत असून यापुढेही ठोळे उद्योग समुह जनसेवेसाठी कायम पुढे असणार आहे.
दरम्यान ठोळे उद्योग समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल एक हजार तीस रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करुन औषधे देण्यात आली तर काहींची पुढील वैद्यकीय उपचाराची व्यवस्था ठोळे परिवाराने मोफत करुन माणुसकीचा भाव जपला आहे. १५ रुग्णावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात मोठ्या उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. या रक्तदान शिबीरात ८१ रक्त दात्यांनी रक्तदान करुन गरजू रुग्णांना जीवदान दिले आहे.
या शिबीरामध्ये प्रवरा मेडीकल ट्रस्ट अंतर्गत डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थापक सागर गाडे, डॉ. सुरेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डॉक्टर, ४ वैद्यकीय कर्मचारी, १५ पॅरामेडिकल कर्मचारी, १२वैद्यकीय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा सामावेश होता तर रुग्णांच्या उपचारासाठी ,स्वतंञ १२ कक्ष लावण्यात आले होते त्यात औषधालय, नेञ विभाग,स्ञिरोग, अस्थीरोग, बालरोग, शल्यचिकित्सा, कान नाक घसा, त्वचारोग, मानसोपचारतज्ञ, दंत चिकीत्सा, फिजोथेरेपी, रक्तदान प्रयोग शाळा आदीचे कक्ष उभे करण्यात आले होते.
या सर्वरोग निदान शिबिराच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद राका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, साई संजीवनीचे चेअरमन पराग संधान, राजेश ठोळे, लायन्सचे अध्यक्ष परेश उदावंत व अंकुश जोशी, लिनेस अध्यक्षा भावना गवांदे,लिओ अध्यक्ष सुमित सिनगर, लिनेस मल्टिपल अध्यक्षा डॉ वर्षा झवर, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे डॉ. सुरेश जगदाळे, शोभा हसे जेष्ठ नागरीक अध्यक्षा सुधा ठोळे, इंग्लिश मेडियमचे मुख्याध्यापक निमोनकर, विजय बंब, दिलीप अजमेरे व सचिन अजमेरे, मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर आदींसह मोठ्या प्रमाणावर नागरिक व रुग्ण उपस्थित होते.