कोपरगाव प्रतिनिधी, दि.६: माजी मंत्री, सहकारमहर्षी व संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर नि:स्वार्थी भावनेने जनसेवा करीत जनसामान्यांच्या कल्याणासाठी आपला देह झिजविला. स्व. कोल्हे हे महाराष्ट्राला समृद्ध करणारे द्रष्टे लोकनेते व उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. स्व. कोल्हे हे केवळ स्वतःपुरते जगले नाहीत तर समाजासाठी जगले. सामाजिक, राजकीय, कृषी, सिंचन, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. अफाट जनसंपर्क व तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटणारा असा कर्तबगार लोकनेता पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत रामायणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा गौरव केला.
राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार, सिंचन, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीने राज्यात व देशात आपला अमिट ठसा उमटवणारे कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी, माजी मंत्री व संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक स्व. शंकरराव गेणुजी कोल्हे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा रविवारी कोपरगाव येथील संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केला होता. यावेळी ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांचे जाहीर हरी कीर्तन झाले. याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेते, माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, भन्ते सुमन आनंदश्री, संत जंगलीदास माऊली आश्रम व आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत परमानंद महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख संत रमेशगिरी महाराज यांनी माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या सोहळ्यास स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सहचारिणी श्रीमती सिंधुताई कोल्हे (माई), भगिनी सुमनताई पवार, कुसुमताई शिंदे, ज्येष्ठ कन्या श्रीमती नीलिमा वसंतराव पवार, स्नुषा भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, स्व. कोल्हे यांचे बंधू दत्तात्रय कोल्हे, सुरेश कोल्हे, अनिल कोल्हे, दिलीप कोल्हे, रजनीश कोल्हे, वसंतराव कोल्हे, राजेंद्र कोल्हे, सचिन कोल्हे, अमृता वसंतराव पवार, प्राची वसंतराव पवार, मनाली कोल्हे, निकिता कोल्हे,रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे तसेच कोल्हे व पवार परिवारातील सदस्यांसह सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम (देवळाली), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर), पांडुरंग अभंग, अण्णासाहेब म्हस्के, डॉ. सुधीर तांबे (संगमनेर), भाऊसाहेब पवार, अनिल कदम (निफाड), राजाभाऊ वाजे (सिन्नर), रावसाहेब म्हस्के, भाऊसाहेब ठोंबरे, सुरेश वाबळे, रवींद्र काळे (पैठण), नानासाहेब पाटील (उस्मानाबाद), राजेंद्र देशमुख (पुणे), अप्पासाहेब पाटील (वैजापूर), महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, राजेंद्र नागवडे, राजेंद्र बापू जाधव, पराग संधान, तहसिलदार विजय बोरुडे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासह संजीवनी उद्योग समुह, संजीवनी शिक्षण संस्था तसेच राज्यभरातील विविध संस्था, पक्ष, संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी तसेच राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार, शैक्षणिक, औद्योगिक. कला, साहित्य, सांस्कृतिक अशा सर्व स्तरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, डॉ. मिलिंद कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे,प्रणव पवार, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, सुमित कोल्हे, इशांत कोल्हे, वेदांत कोल्हे व कोल्हे परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोरगरिबांच्या सेवेसाठी कार्डियाक रूग्णवाहिका व फिरता दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोपरगाव भूषण, समाजभूषण आणि तळागाळातील गरीब हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची घोषणा स्व. कोल्हेंच्या ज्येष्ठ कन्या नीलिमा वसंतराव पवार यांनी यावेळी केली.
स्व.शंकरराव कोल्हे यांच्या शालेय जीवनापासून ते संपूर्ण आयुष्यात घडलेल्या सर्व ठळक घटनांचा वेध घेणारी सचित्र ध्वनीचित्रफित यावेळी दाखविण्यात आली. रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे द्रष्टे लोकनेते होते. ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ घट्ट असल्यामुळेच परदेशी कृषी शिक्षण घेऊनही ते मायदेशी कोपरगावला परत आले आणि त्यांनी या भागात कृषी, सहकार, शिक्षण व औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवली. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी जनसेवेचे व्रत आयुष्यभर जोपासले. कोपरगाव तालुक्यात अनेक विकासकामे करून तालुक्याचा कायापालट केला. त्यांनी या परिसरासह महाराष्ट्र राज्याला समृद्ध केले. तोच वसा घेऊन त्यांची पुढची पिढी मार्गक्रमण करत आहे. स्व. शंकरराव कोल्हे स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या उद्धारासाठी जगले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जनतेसाठी काम केले.
राज्याला सहकार, शिक्षण, कृषी, सिंचन, राजकारण, समाजकारण यासह विविध क्षेत्रात पुढे नेण्यासाठी स्व. कोल्हेसाहेबांनी विशेष प्रयत्न केले. त्यांची कारकीर्द दैदीप्यमान होती.गडगंज श्रीमत पिता आपल्या लाडक्या लेकीचे लग्न जसे थाटात करतो, तसा आजचा हा स्व. शंकरराव कोल्हेंचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आहे. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एवढा मोठा पुण्यतिथीचा सोहळा पाहत आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमाचे सुंदर असे नेटके नियोजन कोल्हे परिवाराने केले याबद्दल रामराव महाराज ढोक यांनी कोल्हे परिवाराचे विशेष कौतुक केले. स्व. कोल्हेंनी कोपरगाव तालुक्याचा कायापालट घडवला. तालुक्यातील जनतेवर जीवापाड प्रेम केले. स्व. कोल्हेंच्या निधनानंतर वर्षभर अख्ख्या तालुक्यात गावोगावी लोकांनी स्व. कोल्हेसाहेबांचे मासिक श्राद्ध घातले. कीर्तनाचे कार्यक्रम केले, अन्नदान केले. यावरून स्व. कोल्हेंविषयी जनतेच्या मनात किती प्रेम आहे. हे लक्षात येते. स्व. कोल्हेंनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना असंख्य माणसं जोडली. साधू, संतांना मानसन्मान दिला.
सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यातही ते सतत अग्रेसर राहिले. स्व.कोल्हे यांच्याशी माझे ऋणानुबंध होते. त्यांना माझे कीर्तन खूप आवडत असे. शेवटपर्यंत त्यांनी माझे कीर्तन ऐकले. अगदी दवाखान्यात असतानाही ते माझे कीर्तन ऐकत असत. आज हजारोंच्या संख्येने जनसमुदाय स्व. कोल्हेंच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित आहेत. हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे, असे ढोक महाराज म्हणाले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, राजा दशरथ यांचा दाखला देत ढोक महाराज म्हणाले, जीवनात दोन गोष्टी कधीही विसरू नका. एक म्हणजे मरण आणि दुसरे म्हणजे मरेपर्यंत जगविणारा परमेश्वर. कानाजवळचे केस पांढरे झाले की, आपल्याला मरणाची नोटीस आली आहे. आपला मृत्यू जवळ आला आहे. राजा दशरथाला मृत्यूची चाहूल लागताच त्याने आपल्या राज्यकारभाराची सूत्रे आपल्या मुलांकडे सोपवली. आपण ज्याला मरण समजतो त्याला संत महात्मे जीवन प्रवासाचा पूर्णविराम समजतात. हा दृष्टीचा बदल आहे.
जेथे जन्म होतो आणि जेथे आई, वडील, भाऊ, बहीण असतात त्याला माहेर समजतात. जेथे नांदायचे असते ते सासर असते, स्व. कोल्हे यांनी सर्व जाती धर्म, पंथातीललोकांना आपलंस केले होते म्हणुनच आज सर्व धर्माचे पंथाचे साधु,संत एकञ आले.असे ढोक महाराजांनी सांगितले.ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, महाराष्ट्र राज्यासाठी सर्वव्यापक निर्णय घेऊन त्याच्या समृध्दीसाठी आयुष्यभर झगडणारे एकमेव नेतृत्व माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे होते. सतत नव्या नव्या तंत्रज्ञान संशोधनाचा ध्यास घेत त्यांनी काळया आईबरोबरच शेतक-याचे उत्पन्न दुप्पट कसे होईल हाच ध्यास जपला. त्यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून स्व शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर त्यांच्या उन्नतीसाठी काम केले. सतत संघर्ष केला आणि सहकारी संस्था जोपासल्या. सर्वसामान्यांसाठी त्यांची असणारी तळमळ आपण जवळून अभ्यासली. विधीमंडळात त्यांच्याबरोबर काम करतांना नेमकेपणाने काय केले पाहिजे याचा अनुभव त्यांच्याकडून मिळाला. कोपरगाव ही त्यांची कर्मभूमी होती. या भूमीला स्व. शंकरराव काळे आणि स्व. शंकरराव कोल्हे यांनी सतत प्रगतीपथावर नेण्यासाठी जे काम केले त्याला राज्यात तोड नाही.
- बिपीनदादा कोल्हे यांचे घनिष्ठ मित्र थायलंडचे माजी शिक्षणमंत्री डॉ.तेराकीट जेरिऑनसेटासिन हे आज खास स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यासाठी कोपरगावला आले होते. त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
साखर कारखानदारी टिकली पाहिजे, जगात नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे त्याचा वापर वाढविला पाहिजे, हा स्व. कोल्हेसाहेबांचा विचार जागतिक खुल्या स्पर्धेत सहकाराला टिकवून ठेवणारा असून, तो यशस्वी करण्यासाठी त्यांनी मोठे काम केले. तांत्रिक सल्ला देण्याची त्यांच्या नेतृत्वात क्षमता होती. शेती सहकार पाणी सामाजिक राजकीय कर्तृत्वात ते सर्वाथाने पुढेच असायचे. व्यक्तीमत्व निरीक्षण ही त्यांची हातोटी होती. जलसंधारणाबरोबरच उपपदार्थ निर्मीतीत त्यांच्या कार्याला तोड नव्हती. वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट संस्था स्थापन करून तिचा ठसा देशभर उमटविण्यांत त्यांचा हातखंडा होता. संजीवनीतील दुध आंदोलनाचा लढा राज्याला दिशादर्शक होता अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते झटले. त्यांचे कार्य आगामी कित्येक पिढयासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले.कार्यक्रमस्थळी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आयुष्यभरातील सर्व वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे फलक लावण्यांत आले होते. हजारोंच्या जनसमुदायाने माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याप्रतीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला. शेवटी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी आभार मानले.