मराठा समाजाच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्या, आमदार काळेंचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यासह कोपरगाव येथे देखील मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे या सर्व आंदोलनांची तातडीने दखल घेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात घातले आहे.

 सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाज आमरण उपोषण व आंदोलने करीत आहे. त्याप्रमाणे कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे देखील ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत हे मराठा समाज बांधव सोमवार (दि.११) पासून आमरण उपोषणास बसले आहेत. 

मराठा समाजाने सुरु केलेल्या या आंदोलनाची तातडीने दखल घेवून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी असे साकडे आ.आशुतोष काळे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना घातले असून त्याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.

तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोळगाव थडी गावामध्ये अज्ञात व्यक्तीकडून मुस्लिम बांधवांच्या पवित्र कुराणची विटंबना करण्याची घटना घडलेली आहे. कोपरगाव मतदार संघात वर्षानुवर्षापासून सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहत आहे. मात्र जाती धर्माच्या नावाखाली समाजा-समाजात तेढ निर्माण होवून मतदार संघात असलेला जातीय सलोखा व एकोप्याला दुभंगण्यासाठी करण्यात आलेल्या या खोडसाळ घटनेची सखोल चौकशी करून या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील आ. आशुतोष काळे यांनी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.