शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : शेवगावच्या बलदवा कुटुंबातील दोघांची शुक्रवारी (दि. २३ ) पहाटेच्या वेळी निघृण हत्या करून चोरट्यानी मोठा ऐवज घेऊन पोबारा केला होता. या दुहेरी हत्या कांडाने परिसर धास्तावला होता . मात्र पोलिस प्रशासनाने अवघ्या ४८ तासाच्या आत या गुन्ह्यातील सराईत आरोपीस जेरबंद केले आहे. यासंबंधीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली.
शेवगावच्या मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ( दि.२४ ) या गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास व्हावा, संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी माहेश्वरी समाज, व्यापारी संघटना, नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढून सदर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला होता.
दरम्यान आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलिस यांची चार स्वतत्र पथके स्थापन करुन विविध ठिकाणी रवाना करण्यात आली . पथकांनी शहरात व परिसरात फिरून घटना ठिकाणचे व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. तसेच विविध भागातील टोल नाक्यावरील उपलब्ध झालेल्या सिसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची चालण्याची पद्धत व त्याने घातलेले कपडे व गुन्हा करण्याची पद्धत या आधारे तीन आरोपी वर लक्ष केंद्रित करण्यात आले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी खेडकर टाबर चव्हाण वय ३२ राहणार म्हारोळा, बिडकीन तालुका पैठण हा सराईत गुन्हेगार सध्या गावी असून तिथे गेल्यास तो मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आहेर यांनी एका पथकास तेथे रवाना केले.
त्यांच्या आदेशानुसार पथकाने पंच व तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन संशयित आरोपी खेडकर यास ताब्यात घेतले. त्याचे कडे शेवगावच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने टाटा एस गाडीतून येऊन गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास शेवगाव पोलीस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत. अशी माहिती देऊन ओला यांनी खेडकर हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध बिडकीनला तीन, शिलेगावला दोन, वाळुंज व बेगमपुरा येथे एकेक असे एकूण सात जबरी चोरीचे व खुनाचेही गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली. आरोपीने कबुली दिली असून सीसीटीव्हीत दिसत असलेली कपडे त्याच्याकडे मिळून आले आहेत.
आरोपी एकटाच गुन्हे करतो. पक्के बंगले किंवा पक्की घरे नाही तर जुन्या वस्तीतल कच्ची घरे तो शोधतो तेथे प्रवेश करणे सोपे जाते. शिवाय त्या भागात व्यापारी मंडळी राहत असल्याने हमखास ऐवज हाती लागतो. तसेच त्याने बलदवा यांचे घर हेरले. तेथे वरच्या मजल्यावर गेला. तेथून गॅलरीचे दार उघडून आत गेला. त्याच्या पद्धतीनुसार आधी वार करून दोघांची हत्या केली. नंतर चोरी केली. पळून जाताना पाहणाऱ्या सुनीता बलदवा यांना वीट फेकून मारली.
आरोपी मालवाहू रिक्षा वापरतो. तीच रिक्षा घेऊन तो शेवगावला आला होता. त्यातूनच तो पळून गेला. त्याचेही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी एक एक कडी जुळवून जुन्या अनुभवाचा वापर करून तपास केल व आरोपीपर्यंत पोहचण्यास यश मिळविले आहे. पत्रकार परिषदेच्या वेळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक विलास पुजारी आदी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, यांच्या मार्गदरशनाखाली, पोलीस सहायक निरीक्षक गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, बाप्पूसाहेब फोलाणे, संदीप दरंदले, किशोर शिरसाट, दत्ता हिंगडे, अतुल लोटके, संदीप चव्हाण, अमृत आढाव, रवींद्र भुंगासे, जालिंदर माने, भारत बुधवंत, बाळासाहेब खेडकर, चालक संभाजी कोतकर, उमाकांत गावडे आदींनी सदरची कामगिरी केली आहे.