शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : ग्रामसेवक युनियनचे माजी राज्याध्यक्ष आणि ग्रामसेवकांचे गतिमान नेतृत्व, ग्रामसेवकांचे मार्गदर्शक एकनाथराव ढाकणे यांना सन २०१९-२० वर आधारित ग्रामपंचायत गणोरे पातळीवर केलेल्या उत्कृष्ट कार्य व प्रशासकीय सेवेबद्दल आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार जिल्हा परिषद मार्फत नुकताच घोषित झाला आहे.
राज्याचे महसूल मंत्री तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांचे हस्ते जि. प चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदिच्या उपस्थितीत ढाकणे याना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा रविवारी (२ जुलै ) सकाळी अकरा वाजता नगर येथे बंधन लॉन्सवर होणार आहे.
ग्रामविकास अधिकारी ढाकणे यांनी ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यापूर्वी देखील त्यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार व नाशिक विभागातील उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्काराने तसेच तीन आगाऊ वेतन वाढीने सन्मानित करण्यात आले आहे. गणोरे ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियान मध्ये एक कोटी रुपयांचे पारितोषिक प्राप्त करून दिले आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम आणि तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळविला असून तीस लक्ष रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
याशिवाय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय स्तरावरील दुसरा क्रमांक, बिहार पॅटर्न अंतर्गत ४००० वृक्षाची लागवड करून यशस्वी संगोपन केले. लोक सहभाग मिळवून एक कोटी रुपयांची कामे ग्रामपंचायत पातळीवर केली आहेत. गणोरे ग्रामपंचायतचे सर्व लेखी अभिलेखे ऑनलाईन असून स्वतःची वेबसाईट ग्रामस्थांना एसएमएस सेवा, संपूर्ण गाव सीसीटीव्ही कक्षेत, स्वतःचे व्हाट्सअप पेज, इंस्टाग्राम, ट्विटर सेवा या माध्यमातून समाजाच्या जनतेच्या संपर्कात असणारी ग्रामपंचायत आहे. स्वतःची वेबसाईट निर्मिती त्याबरोबर पारदर्शक कारभार ही कामकाजाची वैशिष्ट्य आहेत.
घनकचरा व्यवस्थापनाच्या मध्यातून वाहून जाणार्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प गणोरे ग्रामपंचायतीने नुकताच कार्यान्वित केला आहे. ग्रामस्थ आणि प्रशासनाचा ढाकणे उत्कृष्ठ समन्वय साधत असतात. म्हणूनच त्यांचे हातून एवढे प्रचंड कार्य होऊ शकली आहेत.