कोपरगाव शहर पोलीसांची चमकदार कामगिरी
कोपरगाव प्रतिनिधी दि.२९ : कोपरगाव शहर पोलीसांनी अवघ्या दोन दिवसांत घरफोडी करणाऱ्या चोरासह चोरीला गेलेले साडेनऊ लाखाचें दागिने हस्तगत करुन चोराला गजाआड करीत चमकदार कामगिरी केल्याने कोपरगाव शहर पोलीसांचे नागरीकामधून सर्वञ कौतुक होत आहे.
या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, २५ जूलैच्या मध्य रात्री ते २६ जुलैच्या पहाटेच्या दरम्यान कोपरगाव शहरातील कोर्ट रोड परिसरातील मालती रूपेश हाडा यांच्या राहत्या घराच्या मागच्या बाजुच्या किचनच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून किचनच्या ओट्या खाली ठेवलेल्या लोखंडी पेटीतील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीसात मालती हाडा यांनी दिली होती.
पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी गोपिनिय बातमीदाराच्या मदतीने तपासाची चक्रे वाऱ्यासारखी फिरवली. त्यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीनुसार सदरची चोरी गजानन नगर येथे राहणारा शूभम केशव राखपसरे याने केल्याची माहीती मिळाली.
पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी त्यांचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सहायक पोलिस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोलीस कर्मचारी बाबासाहेब कोरेकर, जालिंदर तमनर,महेश तिवरे, किशोर कुळधर, गणेश काकडे, बाळासाहेब धोंगडे, तुषार कानवडे आदींच पथक तयार करुन योग्य त्या सुचना देत संबंधीत आरोपीला पकडण्यासाठी रवाना केले.
दरम्यान मालती हाडा घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम केशव राखपसारे हा शहरात दारु पिऊन खुले आम फिरत होता. त्याला पोलीसांनी पकडून चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. अखेर पोलीसांनी खाक्या दाखवताच त्याने मालती हाडा यांच्या घराची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यातील चोरलेला एकुण ऐवज आपल्या राहत्या घरी डब्यात ठेवल्याचे सांगितले.
पोलीसांनी गजानन नगर येथील त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता एक डब्या मध्ये पिशवीत ३० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ४५ ग्रॅम वजनाचा राणी हार, १० ग्रॅम जनाच्या दोन बिंदिया , २ग्रॅम ओमपान, १० ग्रॅम सोन्याचे पॅन्डल पोत, १५ ग्रॅम सोन्याचे नेकलेस, १० ग्रॅम सोन्याचे कानातील दुबे, १० ग्रॅम काळे मनी असलेले सोन्याचे पॅन्डल सह इतर सर्व मिळून १५० ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत ९ लाख रुपये तर ६५ हजार ७०० रू किमतीचे चांदीचे दागिने असा ९ लाख ६५ हजार ७०० रूपये किंमतेचे सोने चांदीचे दागिन्याचा ऐवज पोलीसांनी ताब्यात घेतला.
पोलीसांनी शुभम राखपसारे यांच्या मुसक्या आवळून त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान पोलीसांनी काही तासांत चोरासह संपूर्ण ऐवज हस्तगत केल्याने शहर पोलीसांचे सर्व कौतुक होत आहे.