शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : सामजिक कामाचा वटवृक्ष असलेल्या आनंदवनच्या प्रेरणेतून व स्नेहालय परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षापासून शेवगावला उचल फाउंडेशन ही संस्था ऊसतोडणी-कामगार, तसेच अनाथ व उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी निवासी शैक्षणिक प्रकल्प चालवत आहे.
ऊस तोडणी कामगारांच्या वारंवार होणार्या स्थलांतरामुळे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका मीनाक्षी शिंदे यांनी आपले वडील स्वर्गीय अशोक एकनाथ कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ मुलींसाठी एक स्वतंत्र हॉलचे बांधकाम संस्थेने सुरू करावे यासाठी दोन लाख रुपयांची मदत केली आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ गट विकास अधिकारी राजेश कदम यांचे हस्ते भारदे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रमेश भारदे, श्रीमती स्नेहलता लबडे, भगवान बाबा मल्टिस्टेट व श्रीरंग उद्योग समूहाचे संचालक मयूर वैद्य, उद्योजक मधुसूदन धूत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भागीनाथ काटे, राजू कुसळकर, वसुधा सावरकर, वनिता डाके, अनुजा लड्डा, सेवानिवृत्त भाऊ साहेब शिंदे गुरुजी, उमेश घेवरीकर उपस्थित होते.
उचल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय लड्डा यांनी प्रास्ताविक केले. त्यानी शासकीय अनुदानाशिवाय केवळ लोक सहभागातून चालविल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी अनेक सहृदा कडून आर्थिक सहकार्य लाभत असून प्रकल्पाच्या विविध प्रकारच्या स्तुत्य उपक्रमासाठी, मुलींच्या नवीन हॉलच्या बाधकामासाठी आणखी मदतीची गरज असल्याने मदतीचा हात पुढे येणे गरजेचे आहे असे आवाहन केले.
या आवाहनाला उपस्थितातील अरुण शेठ, मयूर वैद्य, मधुसूदन धूत, यांनी प्रत्येकी ५१ हजार तर भागनाथ काटे यांनी हॉलची फरशी, राजू कुसळकर यांनी खडी, स्नेहलता लबडे यांनी मासिक किराणा अशा प्रकारे प्रतिसाद देत भरीव सहकार्य केले. डॉ. मनिषा लड्डा यांनी सुत्रसंचलन केले. संचालक सचिन खेडकर यांनी आभार मानले.