कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव मतदार संघात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून या पावसावर मतदार संघातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केलेली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपाचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे ओव्हर फ्लोचे जायकवाडीला वाहून जाणारे पाणी गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना सोडा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोपरगाव मतदार संघात गायब झालेला पाऊस त्यामुळे खरीप हंगामाचे भवितव्य टांगणीला लागले असून पावसाचा मागमूस दिसत नसल्यामुळे पिकांना वेळेत पाणी मिळाले नाही, तर खरीप हंगाम धोक्यात येवून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याबाबत विनंती करून त्यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदार संघामध्ये निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती मांडली आहे. पावसाळा सुरु होवून दोन महिने होत असून मात्र कोपरगाव मतदार संघात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पेरणीचा हंगाम हातातून सुटू नये यासाठी झालेल्या अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरी, कापूस, मका, चारा पिके आदी पिकांच्या पेरण्या केल्या मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे आता खरिपाची पिके जळून चालली असून ऊस पिकाला देखील फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
मात्र दुसरीकडे कोपरगाव मतदार संघातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून जवळपास १२००० क्युसेक्सने ओव्हर फ्लोचे पाणी जायकवाडी धरणाकडे वाहून जात आहे. राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये जरी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असला तरी कोपरगाव मतदारसंघांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. धरण क्षेत्रात पावसाची सततधार सुरु असून गोदावरी कालव्याचे लाभक्षेत्र अवलंबून असलेले दारणा धरण ७८ टक्के व गंगापूर धरण ६८ टक्के भरले असून दारणा धरणातून ११५५२ क्युसेक्स व गंगापूर धरणातून ५३९ कुसेक्स असा ओव्हरफ्लोच्या पाण्याचा जवळपास १२००० क्युसेक्सने विसर्ग सुरु असून यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे.
मात्र दुसरीकडे कोपरगाव मतदार संघातील खरीप हंगाम मात्र पावसाभावी धोक्यात आला आहे. त्यामुळे वेळेत जर खरीप पिकांना पाणी मिळाले नाही, तर खरीप पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी तातडीने गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याबाबत सूचना कराव्यात अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत तातडीने निर्णय घेवू अशी ग्वाही दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.