शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : पुस्तकी ज्ञानापलीकडे व्यवहारोपयोगी शिक्षण पद्धती सक्षम नागरिक घडवत असते. शालेय अध्यापना सोबत जीवनावश्यक संस्कार देणाऱ्या शाळेतून घडणारे विद्यार्थीच स्पर्धेच्या युगात टिकू शकतात. प्रामाणिक प्रयत्नांती मिळालेल्या यशाचा शाळेत झालेला, सन्मान हा विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहीत करत असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्राधान्य देत त्यांच्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या शाळा सध्या दुर्मिळ झाल्या आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केले.
येथील बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा तसेच शासकीय व शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCl) उप महाव्यवस्थापक शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. दीपक पाटेकर म्हणाले, बदलत्या काळानुसार आता शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने सुद्धा बदलत आहेत.
ध्येय कोणतेही असो प्रामाणिक प्रयत्न, जिद्द, चिकाटी आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनच यशाचे गमक आहे. ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य रमेश भारदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महात्मा सार्वजनिक वाचनालयाचे, मुख्य सचिव हरीश भारदे व सहसचिव उमेश घेवरीकर यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त प्रल्हाद कुलकर्णी, प्राचार्य शिवदास सरोदे, उपप्राचार्य संजय कुलकर्णी, उमेश घेवरीकर, सदाशिव काटेकर, गोरक्ष बडे, सेवकवृंद व पालक उपस्थित होते.