शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : शेवगाव येथील बोधेगाव रस्त्यावर नित्य सेवा रुग्णालया जवळून जाणाऱ्या चार चाकी वाहनातून विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी भिंगरी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील व परिक्षाविधीन आय.पी.एस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळाली असता, त्यांनी लगेच एका पोलीस पथकाची नियुक्ती करून छापा टाकण्याचे आदेश दिले.
पथकाने तेथे सापळा लावून सायंकाळी उशीरा मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम.एच. १२ जे. यु. ४७५९ ही गाडी थांबवून चालक श्रीकांत अजय पातकळ (वय १९) रा. चापडगाव तालुका शेवगाव याचेकडे चौकशी करून पथकाने पंचासमोर गाडीची झडती घेतली.
तेव्हा गाडीत प्रत्येक बॉक्समध्ये ४८ देशी भिंगरी कंपनीच्या बाटल्या असे १५ बॉक्स मिळून आले. या घटनेत सदरची स्विफ्ट डिझायनर गाडी व देशी भिंगरी दारू असा एकूण तीन लाख चारशे रुपये किमतीचा मुद्दे माल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलीस नाईक सुधाकर दराडे यांच्या फिर्यादी वरून संशयीत आरोपी पातकळ याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधीनियम कलम ६५ (ई) (ए) अनुसार रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस कॉन्स्टेबल अंगारखे, खिळे यांचे पथकाने केली.