मुलीच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला
शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : किडनॅपिंगचा प्रसंग एका इयत्ता सहावीतील चिमुरडीच्या जीवावर बेतला, मात्र अतिशय जिद्दीने प्रतिकार करत अमिषाला न बाळगता तब्बल चार जणाच्या हातावर तूरी देत तीने आपली सुटका केली. ही घटना तालुक्यातील वडुले खुर्द येथे गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली असून, दिवसभर प्रत्येकाच्या तोंडी या चिमुरडीच्याच धाडसाची चर्चा होती.
वडूल्याच्या संत वामनभाऊ विद्यालयात इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी अश्विनी आजिनाथ गर्जे ही नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा तीच्या मागून येणाऱ्या एक पुरुष व तीन महिलांच्या टोळीने स्विफ्ट डिझायर क्र. MH १६ – १८२२ या गाडीमध्ये येऊन तीला बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला.
अगोदर आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून यातील एका महिलेने गाडीच्या खाली उतरून अश्विनी हीस आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, तुझ्या वडिलांनी तसं आमच्याजवळ सांगितलं आहे, तू आमच्याबरोबर गाडीत बस, असं म्हणून गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला खाऊच्या पुड्याचे आमीषही दाखवण्यात आले. यावेळी अश्विनीने प्रतिकार केला असता, त्यांनी अश्विनीच्या तोंडाला रुमाल बांधला. तरीसुद्धा छोट्या अश्विनीने समय सूचकता ओळखून तोंडाचा रुमाल काढून व हाताला हिसका देऊन पळण्याचा प्रयत्न केला.
टोळीतील तीन महिलांनी पुन्हा तिचा पाठलाग करून तीला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अश्विनीने रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा झाडाला कवळ घातली. यावेळी झालेल्या झटापटीत अश्विनीला किरकोळ खरचटले. मात्र त्याचवेळी रस्त्याने पाठीमागून कोणीतरी येत आहे. पाहिल्यावर चौघेही गाडीमध्ये बसून आव्हाने रस्त्याने पळून गेले.
तत्पूर्वी त्या टोळीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या चैतन्य सुनील आव्हाड हिला सुद्धा रस्त्याने जाताना फुस लावून गाडीमध्ये ओढून पळून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे नंतर समजले. छोट्या अश्विनीने दाखवलेल्या धाडसाने आणि केलेल्या प्रतिकारामुळे तिने स्वतःचे प्राण वाचवले. ही घटना वाऱ्यासारखी गावामध्ये समजतात अनेकांनी तिचे घरी जाऊन कौतुक केले.
विद्यालयाने व वडुले खुर्द ग्रामस्थांनी तीच्या धाडसा बद्दल तीचा प्राचार्य. किसन चव्हाण यांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मेजर सुरेश आव्हाड, आजिनाथ आव्हाड, विष्णू आव्हाड, गोकुळ नागरे, अमोल आव्हाड, अरुण बोरुडे आदी सह अध्यापक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी कायम सतर्क रहावे. तसेच अनोळखी व्यक्ती समवेत कोणत्याही वाहनामध्ये बसू नये. अपरिचित व्यक्तिने काही सांगितले तर त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही आमिषाच्या आहरी जाऊ नये. घरी जातांना शक्यतो एकट्याने न जाता, आपल्या मित्रा समवेत व ओळखीच्या व्यक्ती बरोबर जावे, असे प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले.