कोपरगाव प्रतिनिधी, दि. : कोपरगाव मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी आपल्या गावी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापूजा करून कोपरगाव मतदार संघात भरपूर पाऊस पडावा व दुष्काळाचे सावट हटू दे असे दत्त महाराजांना साकडे घातले.
कोपरगाव मतदार संघ पर्जन्य छायेखाली येत असल्यामुळे दरवर्षी मतदार संघात इतर तालुक्याच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. परंतु राज्यात यावर्षी सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून कोपरगाव मतदार संघात देखील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे सोयाबीन,बाजरी,मका,कापूस,तुर,मकाआदी खरीप पिकांचे मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
त्याच बरोबर रब्बी हंगामाचे भवितव्य देखील टांगणीला लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदार संघासह दुष्काळी परिस्थिती असलेल्या सर्व भागात वरून राजाने कृपा करावी व दुष्काळाचे सावट दूर व्हावे यासाठी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापूजा करून कोपरगाव मतदार संघात भरपूर पाऊस पडावा यासाठी आ. आशुतोष काळेंनी साकडे घातले.
मतदार संघात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती चिंताजनक आहे.या दुष्काळी परिस्थितीचा सर्वच घटकांवर परिणाम होत असून खरीप पिके जळाल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्याच बरोबर बाजार पेठेत देखील काहीसा शुकशुकाट निर्माण झाल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या चिंता वाढल्या असून सर्व सामान्य नागरिकांना देखील या दुष्काळी परिस्थितीची झळ बसली आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी केलेली सामूहिक प्रार्थना वरुणराजा नक्की ऐकेल व यापुढील काळात कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पाऊस होवून सर्वच घटकांना सुख समाधान लाभेल असा आशावाद आ. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी माहेगाव देशमुख व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुवासिनींनी गोदामाईची खणनारळाने ओटी भरली.
मतदार संघातील नागरिकांनी देखील आपापल्या गावातील धार्मिक स्थळी पावसासाठी प्रार्थना करावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले होते. त्या आवाहनाला कोपरगाव शहरासह मतदार संघातील सर्वच गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देवून विविध जाती धर्माच्या नागरिकांनी आपल्या धार्मिक स्थळी मनोभावे प्रार्थना करून वरून राजाला दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी प्रार्थना केली. योगा योगाने गुरुवार पासून कोपरगाव मतदार संघात पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांसह सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.