कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ : जगात भारत देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात जी कामगिरी केली त्याला तोड नाही, तेंव्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच रहावे ही सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले. कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस रविवारी सेवादिन म्हणून साजरा करण्यांत आला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रारंभी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात व तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी पक्षाच्यावतीने मतदारसंघात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विकास कार्याचा लेखाजोखा सांगितला. शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांची अंमलबजावणी केंद्रीय मंत्रिमंडळ तसेच राज्य मंत्रिमंडळाने तंतोतंत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगून राज्य साखर संघाचे संचालक विवेक कोल्हे यांनी तळागाळातील उपेक्षित बांधवांच्या समस्या थेट गाव खेड्यातच सोडवण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावरील अभियान राबत असल्याचे सांगितले.
स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः पेक्षा समाजासाठी जगले, त्यातून त्यांनी दीन-दलित, गोर-गरीब, वंचित, अल्पसंख्याक आदिचे प्रश्न- अडचणी समजुन घेत त्यावर मार्ग काढला, कोरोना महामारीच्या काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवठा करून सांभाळले त्यामुळे या कणखर नेतृत्वाला आपल्यासह सर्वांचे आयुष्य लाभावे अशी साईचरणी प्रार्थना. आज दिव्यांग घटकांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन प्रमाणपत्र, विविध योजनांचे धनादेश अ. भा. कार्ड, राष्ट्रीय कुटुंब आपत्ती योजनेचे लाभ देतांना मनस्वी समाधान होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच जी-20 शिखर परिषद यशस्वी आयोजीत करून जागतिक महासत्तेचे अध्यक्ष जो. बायडेन यांचेबरोबर भारतासह अन्य देशातील अडचणी सोडविण्यासाठी जी सकारात्मक चर्चा करून शांततेच्या मार्गाने तोडगे काढले ती जगासाठी मोठी उपलब्धी आहे. विकसीत भारतासह युवा वर्गाचे प्रश्न आणि त्याच्या यशस्वीतेसाठी तयार केलेला कृतीशील आराखडा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आहे त्यामुळे सर्वांना ते देशाच्या पंतप्रधानपदी तेच रहावे असेच वाटते असे त्या शेवटी म्हणाल्या.
याप्रसंगी सर्वश्री पराग संधान, दिलीप दारुणकर, सत्येन मुंदडा, शिल्पा रोहमारे, रवींद्र पाठक, सुनिल देवकर, कैलास जाधव, प्रकाश शेळके, कैलास राहाणे, विजय आढाव, अविनाश पाठक, दिपक जपे, राजेंद्र बागुल, गोपी गायकवाड यांच्यासह संजीवनी उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे सर्व प्रमुख, कार्यकर्ते, युवक उपस्थित होते. शेवटी जयेश बडवे यांनी आभार मानले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपणासह सेवादिनाचे उपक्रम साजरे करण्यात आले.