कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), गुवाहाटी आयोजीत ‘आयआयटी टेक्निज’ या राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंटरनॅशल स्कूल, शिर्डी व संजीवनी अकॅडमी, कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तिक भाग घेवुन देशात प्रथम क्रमांक पटकावित संजीवनीचा झेंडा थेट गुवाहाटीत रोवला, अशी माहिती स्कूल्सच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या भाग्यवान पालकांचे आणि मार्गदर्शक प्रा. आदित्य गायकवाड यांचे अभिनंदन केले. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन, प्राचार्या सुधा सुब्रमण्यम, हेडमिस्ट्रेस माला मोरे, प्रा. गायकवाड व पालक उपस्थित होते.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, आयआयटीने घेतलेल्या स्पर्धेत देशातील इ. ६ वी ते १२ वी ज्युनियर गट व फक्त इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचा सिनियर गट सामिल होते. आयआयटीने प्रथम ऑनलाईन पध्दतीने देशातील ज्यु. गटाचे सादरीकरण ‘टेकएक्स्पो’ या स्पर्धेअंतर्गत घेतले. त्यातुन फक्त १५ गट निवडण्यात आले. या १५ गटांना गुवाहाटीला प्रत्यक्ष सादरीकरणाला बोलविण्यात आले होते.
त्यात संजीवनी इंटरनॅशल स्कूल व संजीवनी अकॅडमीच्या संमिश्र स्वरूपाच्या दोन गटांचा समावेश होता. यात संजीवनीच्या ‘टेक वारीअर्स’ गटातील विद्यार्थी परीमल दत्तात्रय आदिक, अथर्व देवेश बजाज, श्रेय रूपेश महिंद्रकर व ईशान सचिन क्षिरसागर यांनी संगणकीय हार्डवेअर व सॉफ्टवेअर प्रकल्पांसंदर्भात उत्तम सादरीकरण करून परीक्षकांची वाहवा मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवित संजीवनीचा विजयी झेंडा थेट गुवाहाटीत रोवला. त्यांना प्रमाणपत्र, विजयचिन्ह व रू ५००० चे रोख बक्षिस मिळाले.
तसेच संजीवनीच्या ‘टेक टायटन्स’ गटामधील विद्यार्थी राजविका अमित कोल्हे, नील द्वारकानाथ अरिंगले, साईश जितेंद्र शर्मा व प्रथमेश प्रविण बोराडे यांनीही उत्कृष्ट सादरीकरण देवुन परीक्षकांची वाहवा मिळविली. शालेय पातळीवरील संजीवनीच्या विद्यार्थ्यांचे संगणकीय क्षेत्रातील ज्ञान बघुन आयआयटीच्या प्राद्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याची नेहमी तळमळ असायची. तसे शिक्षण संजीवनीमध्ये दिल्या जाते, देश पातळीवर मिळालेला पुरस्कार हे त्याचेच फलीत आहे. विद्यार्थ्यांना मिळालेला पुरस्कार त्यांनी स्व. कोल्हे यांना समर्पित केला, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.