शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने मतदार संघात मोठ्या प्रमाणावर जनतेची कामे करता आली, मागील पंचवार्षिक मध्ये जलसंधारण कामे रस्ते आणि विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाली २०१९ मध्ये सत्तांतर झाल्याने विकासाला खीळ बसली परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे मतदार संघात केली.
मध्यंतरीच्या कालावधीत तालुक्यातील मुख्य रस्त्यावरून जाणे अवघड झाले होते. परंतु या सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याने मुख्य रस्त्यांची जवळपास सर्वच कामे मार्गी लागली आहेत, शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मुख्य रस्त्यांबरोबर ग्रामीण रस्त्यांचा समावेश अर्थसंकल्पामध्ये केल्याने मुख्य रस्त्यांबरोबर ग्रामीण मार्गांचाही प्रश्न सुटत असल्याचे प्रतिपादन आ. मोनिकाताई राजळे यांनी केले.
अर्थसंकल्पीय तरतूद २०२३ अंतर्गत मंजूर असलेल्या रामा ५० दत्त पाटी ते देवटाकळी या एक कोटी कामाच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. या रस्त्याबरोबरच त्यांनी वाघोली कामत शिंगवे रस्ता ( सव्वा कोटी ) देवटाकळी रस्ता ( ५० लक्ष ) शहरटाकळी अंतर्गत कदम वस्ती ते डोळे वस्ती रस्ता ( ५० लक्ष )अशा ३ कोटी २५ लक्ष रुपये कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रल्हाद पाठक, महिला आघाडी तालुकाअध्यक्ष आशाताई गरड, नगरसेवक सागर फडके, श्रीराम खरड, शंकराव चिकणे, सरपंच संभाजी कातकडे, बाळासाहेब विखे, सुभाष वाघमारे, सुभाषराव बदधे, महादेव पवार, डॉ. शाम काळे, रणजीत वने उपस्थित होते. यावेळी ढोरसडे आंत्रे येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य रोहिदास खबरे, गोकुळ निकम, बाळासाहेब गाढे यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार राजळे पुढे म्हणाल्या, खासदार सुजयदादा विखे व मी मतदारसंघातील विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर भरून काढला आहे, तसेच जास्तीचा निधी आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत. ताजनापूर योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे, उर्वरित कामासाठी मागणी शासनाकडे केलेली आहे. परंतु कामे मंजूर झाली, कामांची निविदा निघाली की, श्रेय लाटण्याच्या उद्देशाने निवेदन देणे – आंदोलन करणे असे प्रकार तालुक्यात होत आहेत. परंतु भाजपाचा कार्यकर्ता चिकाटीने काम करत आहे.
आपण २१०४ व २०१९ च्या निवडणुकीमध्ये पाहिले आहे की, सर्वसामान्य भाजपाचा कार्यकर्ता कोण बरोबर आहे किंवा नाही याचा विचार न करता प्रामाणिकपणे आपल्या बुथवर काम करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीला सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने सामोरे जायचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खरड यांनी केले, सूत्रसंचालन नारायण काळे यांनी केले तर मुसाभाई शेख यांनी आभार मानले.