कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने कोपरगाव शहरातील विविध भागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांच्या कामाची २ कोटी २७ लाख ६९ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्यामुळे या रस्त्यांचे नष्टचर्य संपणार असल्याने नागरिकांनी कोल्हे यांचे आभार मानले आहेत अशी प्रतिक्रीया माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरातील नगरपरिषद हद्दीतील धारणगाव रोड ते मार्केट यार्डला जोडणारा अॅप्रोच रोड (बैल बाजार रोड), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह (धारणगाव रोड) ते मुंदडा बिल्डिंगपर्यंतचा रस्ता, टाकळी नाका (निवारा कॉर्नर) ते माऊली अॅग्रोपर्यंतचा रस्ता, गोदावरी पेट्रोल पंप ते समता (टायनी टाय) स्कूल रोड (मार्केट रोड), समतानगर भागातील लोखंडे यांचे घर ते साई सिटी चरापर्यंतचा रस्ता या सर्व रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
त्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी शासन, पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाकडे या सर्व रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी निधी देण्याची मागणी करून सातत्याने पाठपुरावादेखील केला होता. कोल्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने विशेष बाब म्हणून या रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीसाठी खा. सदाशिव लोखंडे यांचीही मोठी मदत झाली. मात्र, निधी मंजूर होऊनही रस्त्यांची कामे सुरू होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
आपण गोकुळनगरीत पूल बांधून या भागातील नागरिकांची समस्या दूर केली, त्या धर्तीवर बैल बाजार रोडवर अधिक उंचीचा पूल बांधण्याचा आपला मानस आहे. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) कडे जाणारा हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, हा पूल बांधल्याने नागरिकांसह संपूर्ण तालुक्यातून मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे. बाजार समितीसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला धूळ कायम राहत असल्याने व्यापाऱ्यांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आता या रस्त्याचे डांबरीकरण करताना त्याच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार असून, धुळीची समस्या निवारण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे, असे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.
त्यामुळे निधी मंजूर असलेल्या रस्त्यांचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने धारणगाव रोड ते मार्केट यार्डला जोडणारा अॅप्रोच रोड (बैल बाजार रोड), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह (धारणगाव रोड) ते मुंदडा बिल्डिंगपर्यंतचा रस्ता, टाकळी नाका (निवारा कॉर्नर) ते माऊली अॅग्रोपर्यंतचा रस्ता, गोदावरी पेट्रोल पंप ते समता (टायनी टाय) स्कूल रोड (मार्केट रोड), समतानगर भागातील लोखंडे यांचे घर ते साई सिटी चरापर्यंतचा रस्ता या सर्व रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाची २ कोटी २७ लाख ६९ हजार रुपयांची निविदा नुकतीच प्रसिद्ध केली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार आहे.
कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून, खराब रस्त्यांबरोबर धुळीचाही नागरिकांना खूप त्रास होत आहे. पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करवून आणला आहे. या निधीतून आता शहराच्या विविध भागातील रस्त्यांची कामे होत आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारीतील रस्त्यांची कामे गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना कोल्हे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी खराब रस्त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन शासनाकडून निधी मंजूर करवून आणल्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे रूपडे आता पालटणार आहे. त्याबद्दल नागरिकांनी कोल्हे यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.