भारदे विद्यालयाचा स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : निरामय समाजमनाचा पाया प्रेम, आदर आणि विश्वास हा असून विद्यार्थ्यांनी प्रेम ही संकल्पना व्यापक दृष्ट्या समजून घेणे गरजेचे आहे, सध्या समाजात घडत असलेल्या अनेक विघातक गोष्टींच्या मागे अतिरेकी, लालसा दिसून येते. यापासून विद्यार्थी व पालकांनी वेळीच सावध व्हावे आणि संवेदना, समानता आणि सम्यक दृष्टिकोन ही जीवन मूल्ये देणाऱ्या साहित्याच्या अभ्यासातून प्रेमाचा शोध घ्यावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी नारायण पुरी यांनी केले.

येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे, सहसचिव हरीश भारदे, श्याम भारदे, रजनीकांत छेडा, रागिनी भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे, पर्यवेक्षक उमेश घेवरीकर, सदाशिव काटेकर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मुकनाट्य, लोकनृत्य अशा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे नारायण पुरी यांनी मन:पूर्वक कौतूक केले. नारायण पुरी यांनी सादर केलेल्या काटा, झांगडगुत्ता, पोतराज, निसर्गकविता यांना उपस्थितांनी दाद दिली.

पुरी यांच्या हस्ते शाळेच्या क्रीडा, वक्तृत्व, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करण्याऱ्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रा. शिवदास सरोदे यांनी प्रास्ताविक केले. निलेश मोरे यांनी सुत्रसंचलन तर संजय कुलकर्णी यांनी आभार मानले.