शेवगाव प्रतिनिधी, दि.८ : वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्याची पाश्चात्य संस्कृती आता आपल्याकडे बहुतेक ठिकाणी रूढ झाल्याचे आपण पहातो. त्यानंतर शुभेच्छे सह केक भरवण्याचे फोटो व्हायरल करून आनंद साजरा करण्यात येतो.
शेवगावात मात्र, एका अति उत्साही युवकाने चक्क तलवारीने केक कापून त्याचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये स्टेटसवर ठेवल्याने त्याचा शेवगाव पोलिसांनी शोध घेतला. आणि वाढदिवसाच्या आनंदा ऐवजी त्याचेवर पोलिस ठाण्याची वारी करण्याची पाळी आली.
संदिप नवनाथ माळी रा. माळेगावने ता. शेवगाव या युवकाने आपला वाढदिवस तलवारीने केक कापून त्याचा फोटो स्टेटसवर ठेवल्याची माहिती समजल्यावरून शेवगाव पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला तालुक्यातील बोधेगाव येथे ताब्या घेऊन पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता.
त्याच्याकडे पितळी मुठ असलेली दोन फूट लांबीची लोखंडी तलवार आढळून आली. पोकॉ. शाम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून हेकॉ सुधाकर दराडे अधिक तपास करत आहेत.