संस्थेने केलेली सेवा ही साक्षात परमेश्वराची सेवा – वेदांताचार्य रामनाथ महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि.२० :  आर्थिक, दुर्बल, वंचित घटकातील मुलांची संस्थेने केलेली सेवा ही साक्षात परमेश्वराची सेवा करण्यासारखे आहे. चांगल्या कामाचे फळ निश्चित मिळतच असते. म्हणूनच एफ डी एल संस्थेस शाहू फुले आंबेडकर पुरस्कार मिळाला असल्याचे प्रतिपादन पावन गणपती संस्थानचे महंत वेदांताचार्य रामनाथ महाराज शास्त्री यांनी शेवगाव येथे केले.

सन २०२२-२३ चा ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’ मिळाल्याप्रित्यर्थ पुरस्कार लोकार्पण व सन्मान सोहळा येथील आबासाहेब काकडे विद्यालयात  पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.डॉ.विद्याधर काकडे, माजी.जि.प.सदस्या हर्षदा काकडे, प्रा.लक्ष्मणराव बिटाळ, ज्ञानेश्वर महाराज बटुळे, पृथ्वीसिंह काकडे, ॲड.शंकरराव भालसिंग, जगन्नाथ गावडे, अशोक आहेर, मंदाकिनी पुरनाळे, रावसाहेब बर्वे, रविंद्र कुटे, उपस्थितीत होते.

रामनाथ महाराज शास्त्री म्हणाले, आपल्या वसतीगृहातील प्रत्येक मुलगा-मुलगी हे विठ्ठल-रुक्मिणीची रूपे आहेत. त्यांच्यात देव शोधा. हजारो मुलांचे आई-वडील म्हणून आपण त्यांचा सांभाळ करता आहात हे मोठे भाग्याचे क्षण आहेत. विद्येची सेवा करणारे विद्याधर तुम्ही आहात. हर्षदाताई यांचे काम देखील अगदी सिंधुताई सपकाळ यांच्या प्रमाणे आगळे वेगळे आहे.

आदिनाथ शास्त्री म्हणाले, एखाद्या संस्थेस जर पुरस्कार मिळाला तर संस्थाचालक त्याचे श्रेय स्वतः घेतात. परंतु ॲड. काकडे यांनी असे न करता तो पुरस्कार सर्वांना समर्पित केला. यातून कॉ.आबासाहेबांचे त्यांच्यावरील संस्कार व त्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो सत्कार हा प्रामाणिकपणाने केलेल्या कामाची पावती असतो. माऊली व रामलल्ला चरणी प्रार्थना करेल की आपल्या हातून यापुढेही असेच महान कार्य घडो. असे आशिर्वाद दिले.

अॅड.काकडे म्हणाले, ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’ संस्थेला मिळाला याचा मनस्वी आनंद झाला. प्रामाणिक चांगल्या कामाला उशिरा का होईना यश मिळतेच. या अगोदरही सौ.काकडे यांना शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या योगदानाला मी हा पुरस्कार समर्पित करतो. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.