कोपारगाव प्रतिनिधी, दि.२० :- शनिवार (दि.१६ मार्च) रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्यातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गोदावरी नदी संवर्धनासाठी २० कोटी निधी मिळणार असून कित्येक वर्षापासूनची गोदावरी नदी संवर्धनाची मागणी आ. आशुतोष काळे यांच्यामुळे पूर्ण होणार आहे.
त्यामुळे गोदाप्रेमी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे बाळासाहेब रुईकर यांनी म्हटले आहे. या निधीतून दोन किलोमीटर पर्यंतच्या गोदावरी नदी पात्राची स्वच्छता करून गाळ काढणे, प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य घाट बांधणे, जॉगिंग ट्रॅक आणि पथ रस्त्यांची निर्मिती करणे, एक किलो मीटर पर्यंत ड्रेनेज डायव्हर्शन आणि स्टोन पिचिंग करणे, रिटेनिंग वॉल आणि गॅबियन वॉल, स्वच्छता गृह बांधणे, वनीकरण आणि वृक्षारोपण करणे, कचरा कुंडी व नागरिकांना बसण्यासाठी बाक बसविणे, नाला साफसफाई आणि प्लास्टिक कचऱ्याची तपासणी, घनकचरा तपासणी यंत्रे तसेच सोलर स्ट्रीट लाईट बसविणे अशी विविध कामे या निधीतून होणार आहे.
पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या कोपरगाव शहराला मोठी धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असून संपूर्ण मतदार संघाला गोदामाईने आपल्या कवेत घेतलेले आहे. पश्चिमेकडून पूर्वेला वाहणाऱ्या गोदामाईचा कोपरगाव शहराला विस्तीर्ण नदीकाठ लाभलेला असून शहराला वळसा घालणाऱ्या पवित्र गोदावरी नदीकाठ सुशोभित होवून गोदावरी नदीचे संवर्धन व्हावे, पर्यावरण रक्षण व्हावे अशी असंख्य गोदाप्रेमींची व भाविकांची मागणी होती. आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून कित्येक वर्षापासूनची गोदावरी नदी संवर्धनाची मागणी पूर्ण होणार असून त्यामुळे असंख्य गोदाप्रेमी व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे बाळासाहेब रुईकर यांनी म्ह्टले आहे.