कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : श्रीमद भागवत ग्रंथातुन भक्तीमार्गाची शिकवण मिळते. प्रत्येकाच्या जीवनांत साधना, सिध्दता, मर्यादा, अनुग्रह, समन्वय, शास्त्र, संस्कार, नियम, पुर्व इतिहास, सध्याचा काळ, तंत्रज्ञान आदीबाबत सातत्यांने प्रश्न निर्माण होतात. त्या सगळयांची उत्तरे भागवतात आहे. कलीयुगात जीवन सुखकर होण्याचा मार्ग शोधण्यासाठी प्रत्येकाने भागवताचे पारायण, मनन, चिंतन, श्रवण करून ते आत्मसात करावे असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे (बेट सराला) गुरूवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वरनगर मैदानावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे सातवे पुष्प गुंफून कथेची सांगता करताना ते बोलत होते.
महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असुन त्यात आपण सर्व १४० कोटी लोक जन्माला आलो हे भाग्य आहे. मनुष्यदेह असा तसा लाभत नाही, पुर्वजन्मीचं पुण्य आहे त्याची प्रत्येकांने आठवण ठेवावी, दिवसभरांत आपण काय आणि कसे वागलो, कुठे चुकलो आदिबाबतचे परिमार्जन सायंकाळी निद्रा घेतांना त्या भगवंताकडे जरूर सांगावे. मनांला प्रश्न विचारावे आणि दुस-या दिवशी आदल्या दिवसाच्या झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा.
कर्म नेहमी चांगले ठेवावे, मनात कटूता, शत्रु भाव आदी गोष्टींना थारा देऊ नये. लहानपणांचा सवंगडी सुदामा दारिद्रयाने पिचला होता पण भगवंताकडे आपण आपला कसा स्वार्थ साधायचा हे त्यांच्या बुध्दीला पटत नव्हते पण मैत्रभावाच्या नात्यांने सुदामांने भगवंत श्रीकृष्णांची भेट घेत त्यांचे ऐश्वर्य पाहुन मनांतील गोष्टी मनांतच ठेवल्या. श्रीकृष्णासाठी आणलेले पोहे आपल्याकडेच ठेवले पण भगवंत श्रीकृष्णांने त्याची ही भेट गोड मानून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कोपरगाव मद्ये सर्वप्रथम हे भव्य मैदान भाविकांनी एवढ्या मोठ्या स्वरूपात तुडुंब भरून दुसऱ्या मैदानावरही जागा उपलब्ध राहिली नव्हती असा अविस्मरणीय सोहळा घडला असल्याने नागरिक आयोजकांचे कौतुक करत आहेत.
भगवंत भक्ताच्या मनांतील प्रत्येक गोष्ट जाणतो आणि त्याच्यासाठी केलेल्या सेवेतुन तो प्रत्येकाला काहींना काही देण्याचा निश्चीत प्रयत्न करत असतो, तेंव्हा कितीही कष्ट पडले तरी भगवंताचे नामस्मरण जरूर करावे, आपल्या अवती भवती असंख्य गोष्टी घडत असतात त्यातुन ज्ञान ते आत्मसात करावे वाईट गोष्टी सोडुन द्याव्या. श्रीमद भागवत ग्रंथातील दहावा आणि अकरावा स्कंद स्पष्टीकरण करतांना महंत रामगिरी महाराजांनी चालु घडामोडीवर विवेचन करत उपस्थित भाविक भक्तांना कलियुगात जीवन सुखकर कसे होईल याबाबत मार्गदर्शन केले.
वृंदावन येथील कृष्णाजी महाराज यांनी रूक्मीणी श्रीकृष्णाच्या होळीचा साक्षात परमानंद फुलांची होळी खेळून दिला, त्यांनी सादर केलेल्या प्रसंगावर उपस्थित भाविकांनी टाळयांच्या कडकडाटात दाद दिली. गेल्या सप्ताहभर महंत रामगिरी महाराजांच्या भागवत कथेला संगितमय साथ देणा-या सर्व वाद्य, मृदुंग, तबला वादकांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी श्री १००८ महामंडलेश्वर काशिकानंद महाराज, पंचकोशीतील विविध संत महत, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रीमद भागवत कथा सांगता कार्यक्रमांत उपस्थित हजारो भाविकांनी मेणबत्या पेटवत, सुवासिनींनी आरतीचे तबक घेत भगवंताची आरती केली. अंधाराच्या आसमंतात तहसिल कार्यालयाजवळी ज्ञानेश्वरनगर मैदान दिव्यांच्या लख्ख प्रकाशांने उजळून गेले होते. अनेकांनी हे दृष्य भ्रमणध्वनीमध्ये घेतले. शेवटी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आभार मानले.