कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० :- गुढीपाडव्यानिमित दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री साईगाव पालखी सोहळा कोपरगाव यांच्या वतीने ‘आम्ही साईंच्या लेकी, महिला मोटारसायकल अभिवादन रॅली’ आयोजित करण्यात आली होती. या महिला मोटारसायकल अभिवादन रॅलीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी देखील नेहमीप्रमाणे सहभागी होवून महिलांचा उत्साह वाढवला.
सर्व महिलांच्या डोक्यावर शोभून दिसणारा भरजरी फेटा, मराठमोळ्या वेशभूषेत बाईक चालविणाऱ्या उत्साही महिला अन् विविध क्षेत्रांतील महिलांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग यामुळे या महिला मोटारसायकल अभिवादन रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नारीशक्तीचा आदर करण्यासाठी, तिच्या कर्तृत्वाच्या भरारीला सलाम करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य महिला बाईक रॅलीचे कोपरगावकरांनी स्वागत केले.
दैनंदिन जीवनात महिला भगिनी आपल्या घर संसारात नेहमीच व्यस्त असल्यामुळे त्यांना स्वतः साठी कधीच वेळ नसतो. मात्र अशा मराठमोळ्या सणांच्या निमित्ताने आपल्या अलौकिक संस्कृतीचे दर्शन घडवतांना असे उपक्रम महिला भगिनींसाठी स्तुत्य उपक्रम आहेत. यानिमित्ताने महिला भगिनी एकत्र येतात. घर संसार, नातेवाईक यांची जबाबदारी सांभाळत असतांना अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितपणे मदत होते. त्यामुळे महिला भगिनींनी अशा सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे व स्वतःसाठी कधी तरी वेळ दिला पाहिजे असे मत चैताली काळे यांनी व्यक्त केले.
गुढीपाडव्यानिमित कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, ज्येष्ठ महिला समिती, श्री साईगाव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळ व समस्त कोपरगावकर यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पहाट पाडवा’ कार्यक्रमाला गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे या उपस्थित होत्या. यावेळी श्री साईगाव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, ज्येष्ठ महिला समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.