शेवगाव तालुक्यातील शेअर ट्रेडींग मार्केट करणारे फरार होण्याची मालिका सुरुच

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ :  अधिक परताव्याचे अभिष दाखवून कोट्यावधीची माया झाली की रात्रीतून बेपत्ता होणाऱ्या ‘मल्या’ ची संख्या रोज वाढते आहे. गेल्या आठवड्यात लाडजळगाव गावचा वैभव कोकाटे हा आपल्या कुटूंबासह गायब झाला. आता त्याच्या पाठोपाठ तालुक्यातील गदेवाडी येथील आणखी एक बिगबुल शनिवारी रात्री फरार झाला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्याने शेअर मार्केटच्या नावाखाली लोकांकडून सुमारे ३० कोटी रुपये   गोळा केल्याची जोरदार चर्चा आहे.            

शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फसवून कोट्यावधी रुपयांचा चुना लावण्याची मालिका काही थांबेना. शेवगाव पोलीस व अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाचे या सर्व प्रकाराकडे कां दूर्लक्ष होत आहे ? असा सामान्य नागरिकाला पडला आहे. या अगोदर तालुक्यातील चापडगावचे गोरे बंधू , पातकळ, हसनापूरचे झिरपे, सोनविहिरचे काजळे, आंतरवलीचे विघ्ने, लाडजळगावचे कोकाटे यांचे व्यतिरिक्त अन्य बोभाटा न झालेले काही जण असे सुमारे १६ जण परागंदा झाल्याचे लोक सांगतात.

हा आकडा वाढूही शकतो ‘आता काल गदेवाडीचा इंगळे असे एका मागोमाग एक फरार झाल्याने सर्वसामान्य हव्यासी गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. काही गुंतवणूकदार तर पुरते नागवले गेले आहेत. गेल्या आठवड्यात फरार झालेल्या एका बिग बुलने फेसबुक वर लोकांना आणि गुंतवणूकदारांना मी माझं वावर विकून तुमचे निम्मे पैसे देईल असा मेसेज दिला असल्याचे सांगण्यात येते. दूर्दैवाने आज अखेर कोणीही गुंतवणुकदार तक्रार करण्यास पुढे आला नाही.