कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचे दर चांगले असतांनाही २०२३-२४ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादन कमी राहील या अंदाजावर केंद्र शासनाने साखर निर्यातीला परवानगी दिली नाही. त्यामुळे चांगले दर असतांना देखील साखर निर्यात होवू शकली नाही. गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर एक महिन्यातच केंद्र शासनाने बी. हेवी ज्युस पासूनच्या इथेनॉल निर्मितीला बंदी घालत फक्त सी. हेवी पासूनच इथेनॉल निर्मिर्तीचे आदेश काढल्यामुळे साखरेचे उत्पादन वाढले व परिणामी साखरेचे दर कमी होवून साखर उद्योगाचे थोडे फार जुळणारे आर्थिक गणित पुन्हा बिघडले आहे.
त्यामुळे साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी केंद्र शासनाने साखर धोरणांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२३/२४ च्या ६९ व्या विक्रमी गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि.१९) रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चित्राताई बर्डे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात येवून संपन्न झाला याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, २०२३-२४ च्या गाळप हंगामाचा सर्वच कारखान्यांचा ऊस उपलब्धतेचा अंदाज चुकल्यामुळे अपेक्षापेक्षा दीड ते दोन महिने गाळप हंगाम उशीरा बंद झाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कारखान्याचे दोन टप्प्यामध्ये आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्यात आले असून कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ६००० मे.टन एवढी झाली आहे. दोन्ही टप्प्याचे काम वेळेत व यशस्वी पूर्ण करुन चालू गाळप हंगाम २०२३-२४ हा संपूर्ण नवीन मशिनरीवर घेतांना कारखान्याच्या १६७ दिवसांच्या गाळप हंगामात एकूण ८,४५,७३४ मे.टन ऊस गाळप करून आजपर्यंतचे उच्चांकी गाळप करुन साखर उताराही समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसेंदिवस ऊस तोडणी कामगार मिळणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे ऊस तोड यंत्राद्वारे तोडणी सोईची होईल अशा पध्दतीने ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी ऊस लागवड करणे काळाची गरज आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीस पक्व ऊसाची गरज असल्यामुळे आडसाली ऊस लागवड केल्यास हि गरज पूर्ण होवून कारखान्याला सुरुवातीला बाहेर गेटकेन करीता जावे लागणार नाही. टप्प्याटप्याने आडसाली, पूर्वहंगामी, सुरु या ऊस लागवडी व्ही.एस.आय., पुणे यांच्या सल्ल्याने केल्यास कारखान्यास पक्व ऊसाचा पुरवठा होऊन ऊस उत्पादन व साखर उत्पादन वाढीस मदत होईल व शेतकी विभागास ऊस तोडणीचे योग्य नियोजन करणे शक्य होईल.
पुढील हंगामात प्रतिदिन ६००० मे. टनापेक्षा जास्त गाळप करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांनी लावलेल्या या वटवृक्षाचे सर्वांच्या सहकार्याने नव्यारुपात बहरावा यासाठी प्रयत्न करून बाजारात आपल्या साखरेचा ब्रॅण्ड तयार करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्हा.चेअरमन डॉ.मच्छिंद्र बर्डे, संचालक सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे,
सुरेश जाधव, विष्णू शिंदे,श्रावण आसने,गंगाधर औताडे, जिनिंग प्रेसींगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह संचालक सुभाष गवळी,गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव कोल्हे, सिकंदर पटेल, वसंतराव वैराळ, देवराम दवंगे, दिलीपराव शिंदे,कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे,आसवणीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार संचालक सचिन चांदगुडे यांनी मानले.
पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचा प्रश्न प्रत्येक अधिवेशनात हा प्रश्न पोटतिडकीने मांडला – पाणी प्रश्नाच्या बाबतीत खूप बोलण्यासारखे असून अनेक प्रश्न आहेत मात्र जे आज आपल्यात नाहीत त्याच्याविषयी बोलणे उचित नाही. पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचे अत्यंत गरजेचे आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे प्रत्येक अधिवेशनात हा प्रश्न पोटतिडकीने मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे. ज्या त्या व्यासपीठावर ज्या त्या गोष्टी बोलतो. परंतु तालुक्यातील ज्येष्ठ नेत्याने प्रश्न उपस्थित केल्यामुळे नाईलाजास्तव बोलावे लागत आहे. निवडणुका आल्या कि, पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचे त्यांना आठवते. ज्यांना लोकांनी नाकारले त्यांनी बोलणे हास्यास्पद असून चाळीस वर्ष एकहाती सत्ता असतांना त्यावेळी का सुचले नाही? ज्या गोष्टीशी तुमचा संबध नाही, ज्यावर तुमचा अभ्यास नाही, त्यावर तुम्ही भाष्य करणे योग्य नाही.गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीलाचा चारशे ते पाचशे कोटी लागणार आहे. २० वर्षापूर्वी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचा खर्च जवळपास २० ते २५ हजार कोटीचा होता तो आज कुठपर्यंत गेला असेल याची अगोदर माहिती घ्या. आणि भाम, भावली, कश्यपी, वालदेवी, मुकणे, फुकणे हे आता बस करा असा खोचक टोला आ. आशुतोष काळे यांनी ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हे यांना लगावला आहे.