रोहमारे कुटुंबाचे दातृत्व महान – प्रा. प्रशांत मोरे

राज्यस्तरीय भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : “भि.ग. रोहमारे ट्रस्ट पोहेगाव आणि त्यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार म्हणजे ३५ वर्षांची महायात्रा आहे. अख्या जगाचा पोशिंदा असलेला आणि आज हवालदिल झालेला शेतकरी-शेतमजूर, नांगरणी, पेरणी, खुरपणी, पशु-पक्षी;  एकूणच कृषी-संस्कृती आणि गावगाड्याचे वास्तव चित्रण करणाऱ्या कवी, कथाकार आदी साहित्यिकांना दिला जाणाऱ्या या पुरस्काराचे मोल आणि महत्त्व खूप मोठे आहे. 

सुप्रसिद्ध कवी फ.मु. शिंदे जेव्हा भेटतात तेव्हा या पुरस्काराविषयी भरभरून बोलतात. रोहमारे कुटुंबाचे दातृत्व महान आहे. भविष्यात देखील हा पुरस्कार सुरू ठेवावा अशी विनंती मी रोहमारे कुटुंबीयांना करतो,” असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककवी आणि वक्ते प्रा. प्रशांत मोरे यांनी येथे केले. कवी प्रा प्रशांत मोरे यांनी याप्रसंगी आपल्या मैना, पोरी, आई या कवितांचे सुमधुर आवाजात सादरीकरण करून श्रोत्यांना खिळवून ठेवले.

स्थानिक के जे सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या साकरबेन सोमैया सभागृहामध्ये आयोजित के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.

            कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना अशोकराव रोहमारे म्हणाले की, “आजपर्यंत या पुरस्काराने १७० पेक्षा अधिक ग्रामीण नवसाहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.  कै. के. बी. साहेबांनी लावलेलं हे रोप जपण्याचं काम आम्ही आजतागायत केलं आहे आणि पुढेही ते जपले जाईल अशी ग्वाही मी देतो. सोलापूर येथील भैरू रतन दमानी पुरस्कार बंद झाल्याचे दुःख खूप मोठे आहे. पण हा पुरस्कार आम्ही बंद होऊ देणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नव्या दमाच्या उत्साही आणि तरुण लेखकांना बळ देणारा हा पुरस्कार आहे. आजपर्यंत ज्यांना हा पुरस्कार दिला गेला, त्यांना नंतर अनेक मोठ-मोठे सन्मान प्राप्त झाले, यातच आमच्या कामाची फलश्रुती आहे.”

कार्यक्रमाचे दुसरे अतिथी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रशांत आंबरे म्हणाले की, “के.बी. रोहमारे आणि त्यांचे कर्तुत्व खूप मोठे होते. १९४२ च्या चले जाव आंदोलना दरम्यान नाशिक येथे झालेल्या आंदोलनात दादांचा सहभाग होता. तेथे झालेल्या गोळीबारात बंदुकीची एक गोळी के.बी. साहेबांच्या काना जवळून गेली. पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर के.बी. साहेबांनी राजकारण समाजकारण आणि शिक्षण तसेच इतर अनेक क्षेत्रात डोंगराएवढे कार्य केले. के.बी. साहेब अहमदनगर जिल्ह्यातील सहकाराचे अग्रदूत ठरलेत.

संजीवनी व कोपरगाव सहकारी साखर कारखाना तसेच जिल्हा बँकेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. दादांनी आपल्या कार्याने दीपस्तंभ निर्माण केला आणि प्रकाशाची वाट तयार केली, दादांचे व्यक्तिमत्व अत्तरासारखे होते.” पुढे डॉ. आंबरे यांनी मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यपंक्तीने के.बी. साहेबांना आदरांजली अर्पण केली.

पुरस्कार वितरण झाल्यानंतर साहित्यिकांच्या प्रतिक्रियांमध्ये पुरस्कार प्राप्त कवी लक्ष्मण महाडिक म्हणाले की, कवयित्री मनीषा पाटील हरोलीकर म्हणाल्या की “भि.ग. रोहमारे साहित्य पुरस्कार हा ग्रामीण साहित्यातील अकादमी पुरस्कार आहे. या पुरस्काराबरोबरच पुरस्कार देणारे देखील खूप मोठे आहेत. कारण गेली ३४ वर्ष ते सतत हा पुरस्कार देऊन आम्हा लेखकांचं पाठबळ वाढवत आहेत. “धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेजवळील खंबाळसारख्या अत्यंत दुर्गम भागातील नवकवी प्रवीण पवार यांनी देखील आपल्या ‘भुई आणि बाई’ या कवितासंग्रहाची भूमिका विषद करताना पुरस्कार योजनेचे मनोमन आभार मानले.

‘हावळा’ कथासंग्रहाचे लेखक गणपत जाधव म्हणाले की “आजचा ग्रामीण माणूस हरभऱ्याच्या हावळ्यासारखे होरपळून निघत आहेत, त्यांची व्यथा आणि वेदना चित्रित करण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलं आहे, त्याचीच पावती म्हणजे हा पुरस्कार होय.” पुरस्कार प्राप्त हेडाम कादंबरीचे लेखक नागू विरकर यांनीही आपल्या प्रांजळ भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. पुरस्कृत समीक्षक डॉ. रवींद्र कानडे आणि डॉ. मारोती घुगे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाहुण्यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महाविद्यालयाच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त इतिहास व त्यामागे के. बी. साहेबांचे योगदानावर प्रकाशझोत टाकला. कर्यक्रमाच्या प्रारंभी  सहकार्यवाह प्रोफेसर (डॉ.)  जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविकात भि. ग. रोहमारे ट्रस्टची स्थापना व पुरस्कार योजनेची पार्श्वभूमी कथन करताना सांगितले की “गेल्या ३४ वर्षापासून अव्याहतपणे भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार दिला जातोय.  या पुरस्कार योजनेत संयोजक आणि परीक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. 

कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाविना निवड समिती काम करते.  आज पर्यंत १७० ग्रामीण साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविले गेले असून त्यातील अनेकांना इतर मोठे मानसन्मान लाभले आहेत.” त्याचबरोबर त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यवाह डॉ. गणेश देशमुख यांनी देखील भि.ग. रोहमारे ट्रस्ट आणि रोहमारे कुटुंबीयांनी ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय योगदानावर प्रकाशझोत टाकला. परीक्षकांच्या वतीने प्रा लक्ष्मण महाडिक, प्राचार्य डॉ. भीमराव वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले.


चालू वर्षी नागू विरकर यांना हेडाम या ग्रामीण कादंबरीसाठी, गणपत जाधव यांना हावळा या ग्रामीण कथासंग्रहासाठी विभागून, आप्पासाहेब खोत यांना काळीज विकल्याची गोष्ट, मनीषा पाटील हरोलीकर यांना नाती वांझ होताना या उत्कृष्ट ग्रामीण कवितासंग्रहासाठी  विभागून, प्रविण पवार यांना भुई आणि बाई या उत्कृष्ट ग्रामीण कवितासंग्रहासाठी विभागून, डॉ.रवींद्र कानडजे यांना शेतकरी जीवनसंघर्ष :ऐतिहासिक परामर्श या उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून, डॉ. मारुती  घुगे यांना १९८० पूर्वीची ग्रामीण कविता ‘प्रेरणा आणि प्रवृत्ती’  या उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून, पुरस्काराचे स्वरूप रुपये १५००० /- रोख, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे होते.

सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. वर्षा आहेर यांनी केले. याप्रसंगी को.ता.एज्यु. सोसायटीचे सचिव विधिज्ञ संजीव कुलकर्णी, भि. ग. रोहमारे ट्रस्टचे सचिव रमेशराव रोहमारे, संस्थेचे विश्वस्त जवाहर शहा, रोहिदास होन, संदीप रोहमारे, विधिज्ञ राहुल रोहमारे, चंद्रशेखर कुलकर्णी, अॅड संजय भोकरे, माधवराव  खिलारी आदींसह विद्यार्थी, रसिक श्रोते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यवाह डॉ. गणेश देशमुख, सहकार्यवाह डॉ. संजय दवंगे,  रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, आबासाहेब कोकाटे, सर्व प्राध्यापक व  प्राध्यापकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.