कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : उबाठाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपली जमीन हडप केल्याचा आरोप त्यांच्याच पक्षाचे युवासेना उप जिल्हा प्रमुख संदिप रमेश विघे यांनी केला आहे. याबाबतची चौकशी करून आपल्याला न्याय मिळावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी याबाबतचे पत्रच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. पत्रात त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे हे आपल्या कुटुंबार अन्याय करत असल्याचेही म्हटले आहे. या पत्राचा खुलासा महायुतीचे उमेदावर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला व याची चौकशी केली जाणार असल्याचेही सांगितले.
उबाठाचे उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या पत्नी सरस्वती वाकचौरे यांच्या नावे यांच्याकडून मुरलीधर कोंडाजी विघे व विष्णू कोंडाजी विघे यांना यांना भूलथापा देवून २००८ साली सावळीविहीर हद्दीतील गट नंबर ३ मधील ५० गुंठे जमीन खरेदी केली. या जमीनीचे साठेखत करण्यात आले. साठेखता नंतरही अनेकवेळा मागणी करूनही जमीनीचा मोबादला दिला नाही. शेवटी आम्ही न्यायालयात याबाबतचा दावा दाखल केला. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला असल्याचेही संदिप विघे यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात या जमिनीच्या काही भागाचे नगर- मनमाड महामार्गासाठी भूसंपादन झाले. भूसंपादनाचा मोबादला महसूल विभागाने विघे कुटुंबाच्या नावाने वर्ग केला. मात्र सरस्वती भाऊसाहेब वाकचौरे यांनी यावर हरकत घेवून जाणून बुजून त्रास द्यायला सुरवात केली. सरस्वतीबाई भाऊसाहेब वाकचौरे यांनी दाखल केलेला दावा कोपरगाव येथील दिवाणी न्यायालयाने नामंजूर देखील केलेला आहे. तरीपण वाकचौरे यांनी जाणून बुजून आमच्या कुटुंबाला त्रास द्यायला सुरवात केली. त्यामुळे जमीनीचा मोबदला आमच्या कुटुंबाला अद्याप मिळाला नसल्याची खंतही संदीप यांनी व्यक्त केली.
याबाबतची तक्रार पक्षश्रेष्ठीनांही अनेकवेळा केली, तसेच पक्षाने अशा माणसाला तिकीट देऊ नये अशी मागणीही आपण पक्षश्रेष्ठींकडे केली होती. म्हणूनच आपण काल मुख्यंत्री प्रचाराच्या निमित्ताने येणार असल्याचे कळाल्यावर आपण त्याबाबतचे पत्र दिले असल्याचे संदिप विघे यांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लक्ष घालून आमच्या कुटुंबाला न्याय देतील अशी अपेक्षाही विघे यांनी व्यक्त केली.